रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश; आरोग्य शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद
सेवा संकल्प अभियानांतर्गत एटापल्लीत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर; २७ रक्तदात्यांचा सहभाग
राकेश तेलकुंटलवार/उपसंपादक महाराष्ट्र प्रहार न्यूज
एटापल्ली : गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ, एटापल्ली तथा नगरपंचायत कार्यालय, एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने बसस्थानक परिसरात रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रक्तदान शिबिरात गणेश मंडळाचे सदस्य तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित एकूण २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे काही महिलांनीही पुढाकार घेत रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे भान जपले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले.
दरम्यान, आरोग्य तपासणी शिबिरात परिसरातील अनेक नागरिकांनी सहभाग घेत विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरासाठी आरोग्य विभाग तसेच नगरपंचायत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून सामाजिक उपक्रमांना चालना मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळाचे अध्यक्ष राघवेंद्र सुल्वावार, उपाध्यक्ष संपत पैडाकुलवार, सचिव अनिकेत मामीडवार, सहसचिव तनुज बल्लेवार तसेच मंडळाचे सदस्य अक्षय गहेरवार, अनिकेत मोहुर्ले व अभिनव पैडाकुलवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
Tags:
आरोग्य विभाग