(ए आय फोटो)
२२ बॅरल गुडामोहाचा सडवा जप्त; तब्बल ४ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल आष्टी पोलिसांच्या हाती
आष्टी : आष्टी पोलिसांनी कान्हाळगाव जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत गुडामोहाचा सडवा, दारू गाळण्यासाठीचे साहित्य असा एकूण ४ लाख ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी असलेले आरोपी दाट जंगलाचा फायदा घेत पसार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजा कान्हाळगाव जंगल परिसरातील नाल्याजवळ, आष्टीपासून सुमारे २३ किलोमीटर उत्तरेस हातभट्टी दारू गाळली जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी छापा टाकला.
यावेळी काही इसम लाकडाची चूल पेटवून हातभट्टी पद्धतीने गुडामोहाचा सडवा तयार करून दारू गाळताना आढळून आले. मात्र, पोलिस व पंचांची चाहूल लागताच संबंधित इसमांनी दाट झाडीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळी उपस्थित पंच तसेच शेळ्या व गुरे चारणाऱ्या व्यक्तींनी पसार झालेल्या इसमांची ओळख पटविल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष परिसराची झडती घेतली असता जमिनीत खड्डे करून लपवून ठेवलेले २२ बॅरल गुडामोहाचा सडवा, हातभट्टी दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य व इतर मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून त्याची एकूण किंमत ४ लाख ५६ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी दीपेश दीपक बारई (वय ३२), अजय बिशवनाथ दास (वय ३६), बिशजीत नारायण सरकार (वय ३८) आणि रनजित सुनील सरकार (वय ४३), सर्व रा. राममोहनपूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस स्टेशन आष्टी येथे अपराध क्रमांक २८०/२०२६, कलम ६५(क), ६५(ई), ६५(फ), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Tags:
पोलिस विभाग