महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती वनक्षेत्रात वन्यजीव संरक्षणासाठी संयुक्त समन्वय

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती वनक्षेत्रात वन्यजीव संरक्षणासाठी संयुक्त समन्वय

अवैध शिकार, वन्यजीव तस्करीला आळा घालण्यासाठी दोन्ही राज्यांच्या वनविभागांचा निर्धार; संयुक्त गस्त व माहितीची देवाणघेवाण वाढविणार

राकेश तेलकुंटलवार /उपसंपादक महाराष्ट्र प्रहार न्यूज 

एटापल्ली : महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत असलेल्या वनक्षेत्रात वन्यजीव संरक्षण अधिक प्रभावी करण्यासोबतच अवैध शिकार, वन्यजीव तस्करी आणि वनसंपदेवरील अवैध कारवायांना आळा घालण्यासाठी दोन्ही राज्यांच्या वनविभागांची संयुक्त समन्वय बैठक १८ सप्टेंबर २०२६ रोजी एटापल्ली येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात पार पडली.
भामरागड वनविभाग आणि छत्तीसगडमधील भानुप्रतापपूर वनमंडल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीत सीमावर्ती वनक्षेत्रातील वन्यजीवांचा वावर, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना, मानव-वन्यजीव संघर्ष तसेच अवैध शिकार व वन्यजीव तस्करीच्या संभाव्य मार्गांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सीमावर्ती वनक्षेत्रातील वन्यजीवांच्या हालचाली या प्रशासकीय सीमांपुरत्या मर्यादित नसतात. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या वनविभागांमध्ये सातत्यपूर्ण समन्वय आणि वेळेवर माहितीची देवाणघेवाण आवश्यक असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
संशयास्पद हालचालींवर ठेवणार लक्ष
बैठकीत संशयास्पद व्यक्ती व वाहनांची माहिती, शिकारीच्या घटना, वन्यजीवांच्या हालचाली, तस्करीचे संभाव्य मार्ग तसेच संवेदनशील वनक्षेत्रांची माहिती परस्परांमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. सीमावर्ती भागात नियमित संपर्क ठेवण्यासोबतच आवश्यकतेनुसार संयुक्त कारवाई करण्याबाबतही दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधण्याचे ठरविण्यात आले.
तसेच सीमावर्ती वनक्षेत्रात संयुक्त गस्त, नियमित समन्वय, माहितीची देवाणघेवाण आणि परस्पर सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
‘वन्यजीव संरक्षण ही सामूहिक जबाबदारी’
यावेळी भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेश मीना म्हणाले, “वन्यजीवांचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. राज्यांच्या सीमापलीकडेही वन्यजीव संवर्धन, अवैध शिकार व तस्करी रोखण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचे ठरविण्यात आले आहे. या बैठकीचा सकारात्मक परिणाम येत्या सहा महिन्यांत दिसून येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीस भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक शैलेश मीना, भानुप्रतापपूर वनमंडलाचे वनमंडल अधिकारी एस. नवीनकुमार, डी.जी. रामटेके, ए.के. मडावी, एस.एस. नाग, सहायक वनसंरक्षक एन.के. खोब्रागडे (वनपरिक्षेत्र अधिकारी, एटापल्ली), डब्ल्यू.एस. नगराळे (वनपरिक्षेत्र अधिकारी, कसनसूर), एन.एच. बनसोड (वनपरिक्षेत्र अधिकारी, पेंढरी) तसेच कापसी, पूर्व परलकोट व पश्चिम परलकोट येथील वनपरिक्षेत्र अधिकारी उपस्थित होते.
सीमावर्ती जंगलातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र आणि छत्तीसगड वनविभागांमध्ये वाढविण्यात येणारा समन्वय भविष्यातील वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
थोडे नवीन जरा जुने