क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळते..
— क्रीडा तथा स्काऊट शिक्षक कालिदास बन्सोड यांचे प्रतिपादन...
तालुका प्रतिनिधी चामोर्शी :- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ बौद्धिक ज्ञान पुरेसे नसून त्यासोबत शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो, त्यांच्यातील आत्मविश्वास, नेतृत्वगुण, शिस्त, संघभावना आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीमध्ये क्रीडा स्पर्धांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन भारतरत्न डॉ.बी.आर. आंबेडकर विद्यालयाचे क्रीडा तथा स्काऊट शिक्षक कालिदास बन्सोड यांनी केले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या वतीने चामोर्शी तालुका शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून कालिदास बन्सोड बोलत होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कालिदास बन्सोड म्हणाले की, अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. क्रीडा क्षेत्रामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेत वाढ होण्यासोबतच मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते. विजय-पराजयाचा स्वीकार करण्याची मानसिकता, आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य, नियोजन, संयम आणि परिश्रम करण्याची सवय क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडीच्या खेळात सहभागी होण्यासाठी शाळांनी प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला तालुका समन्वयक राकेश खेवले, प्रमोद भांडारकर, गिरीश तुमंपल्लीवार, पंकज येलमुले, मोरेश्वर कुनघाडकर, कृपांती बोरसरे, चंदु खोब्रागडे, सुरज सोयाम, कार्तिक चौके, सचिन सोमनकर, विशाल आत्राम, राकेश वासेकर, ओम कळसकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या तालुका शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये चामोर्शी तालुक्यातील विविध शाळांमधून विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण होण्याबरोबरच परस्परांमध्ये मैत्री, संघभावना आणि खेळाडूवृत्ती वाढीस लागण्यास मदत होत आहे. शाळांमधील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना स्पर्धांसाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच उपस्थितांचे आभार तालुका समन्वयक राकेश खेवले यांनी मानले. यावेळी तालुक्यातील विविध शाळांमधून स्पर्धांमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी, शिक्षक आणि क्रीडा मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.
Tags:
शिक्षण विभाग