रस्ता कामावरून वाद; दोन पत्रकारांविरुद्ध पोलिसांकडे स्वतंत्र तक्रारी
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील हालेवारा परिसरात सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या कामावरून झालेल्या वादानंतर दोन पत्रकारांविरुद्ध पोलिसांकडे स्वतंत्र तक्रारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आलापल्ली येथील पत्रकार महेश गुडेंटीवार व आनंद दहागांवकर यांच्याविरोधात हालेवारा तसेच एटापल्ली पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यात आल्याचे समजते. या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सुमारे ४.३० ते ५ वाजताच्या दरम्यान एटापल्ली-कसनसूर मार्गावरील हालेवारा गावाजवळ लॉयड्स मेटल्स कंपनीकडून रस्ता बांधकामाचे काम सुरू होते. यावेळी पत्रकार महेश गुडेंटीवार व आनंद दहागांवकर आणि कंपनीच्या कामावर असलेले अभियंते आशीष गंपावार व मनिकंदन यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेबाबत कंपनीचे अभियंता आशीष गंपावार यांनी पोलिसांकडे दिलेल्या तोंडी माहितीत शिवीगाळ व धक्काबुक्की झाल्याचा आरोप केल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तींची माहिती घेत तपास सुरू केला आहे.
दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी सुमारे ६ ते ७ वाजताच्या सुमारास एटापल्लीपासून काही अंतरावर असलेल्या एकरा नाल्याजवळ घडलेल्या दुसऱ्या घटनेबाबतही पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. रेहाना नसरू शेख (वय ३६) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तोंडी बयानात दोन पत्रकारांविरोधात दारूच्या नशेत शिवीगाळ व गैरवर्तन केल्याचा आरोप केल्याची माहिती आहे.
या दोन्ही घटनांबाबत पोलिसांकडून संबंधित तक्रारदारांचे बयान नोंदवून घेतले जात असून, प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित व्यक्तींचीही माहिती घेतली जात आहे.
आरोपांची सत्यता तपासणीनंतरच स्पष्ट होणार
दरम्यान, पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारी या संबंधित तक्रारदारांनी मांडलेल्या आरोपांवर आधारित आहेत. या आरोपांची स्वतंत्रपणे सत्यता अद्याप सिद्ध झालेली नाही. त्यामुळे केवळ तक्रारीतील आरोपांच्या आधारे संबंधित पत्रकारांना दोषी ठरविता येणार नाही. पोलिसांच्या तपासानंतरच या दोन्ही घटनांमागील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
घटनास्थळावरील परिस्थिती, संबंधित व्यक्तींचे बयान तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या प्रकरणाचा तपास एटापल्ली पोलीस ठाण्याचे ठाणेदार मच्छिंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती आहे.
Tags:
पोलिस विभाग