चामोर्शीत तान्हा पोळ्याचा जल्लोष; ‘चामोर्शी रत्न’ पुरस्काराने मान्यवरांचा गौरव....

चामोर्शीत तान्हा पोळ्याचा जल्लोष; ‘चामोर्शी रत्न’ पुरस्काराने मान्यवरांचा गौरव....

बालगोपालांच्या आकर्षक नंदीबैल सजावटीने वेधले लक्ष; १५० हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग... — आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते ड्रॉईंग किटचे वाटप...
तालुका प्रतिनिधी चामोर्शी:-
‘विदर्भाची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी शहराची भव्य तान्हा पोळा उत्सवाची ओळख केवळ गडचिरोली जिल्ह्यातील विदर्भातच नव्हे तर राज्याच्या पटलावर मागील चार वर्षांपासून अधिक ठळक झालेली आहे. यंदाही चामोर्शी नगरपंचायत प्रांगणात बालगोपालांचा पारंपरिक तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विविध रंग, फुले, आकर्षक सजावटीचे साहित्य आणि कल्पकतेचा वापर करून सजवून आणलेल्या नंदीबैलांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तब्बल १५० हून अधिक बालगोपालांनी या उत्सवातील विविध उपक्रमांत सहभाग घेतला.
या उत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे शहराच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘चामोर्शी रत्न’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्यामुळे यंदाच्या तान्हा पोळ्याला परंपरा, संस्कृती, बालप्रतिभा आणि सामाजिक कर्तृत्वाचा अनोखा संगम लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. अशोक नेते होते. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे,प्राचार्य डॉ. हिराजी बनपुरकर, किशोर ओल्लालवार, भाजपा तालुकाध्यक्षा तथा नगरपंचायत महिला व बालकल्याण सभापती रोशनी वरघंटे, सामाजिक कार्यकर्ते कविश्वर आईंचवार, यशवंत त्रिकांडे, सेवानिवृत्त न्यायाधीश सुनिलजी दीक्षित गुरुजी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माणिकराव तुरे, युवा नेते तुषार दूधबळे, अविनाश तालापल्लीवार, निरज रामानुजनवार, नरेश अल्सावार, भुवनेश्वर चुधरी, शुभंमकर चक्रवती आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अमोल आईंचवार, नगरसेविका अॅड. प्रेमाताई आईंचवार, युवा नेते रमेश अधिकारी आदींच्या पुढाकारातून करण्यात आले.
*चामोर्शी रत्न’ पुरस्काराने कर्तृत्ववानांचा सन्मान*
चामोर्शी शहराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी ‘चामोर्शी रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दीक्षित गुरुजी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माणिकराव तुरे, सेवानिवृत्त शिक्षक दुबे, डॉ. तामदेव दूधबळे, उद्योजक तपन दोषी, रवीभाऊ वाकुडकर आदी मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाजासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेत त्यांचा सार्वजनिक सन्मान केल्यामुळे उपस्थितांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अशा गौरवामुळे सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
*नंदीबैल सजावट स्पर्धेत बालगोपालांची चमक*
तान्हा पोळा उत्सवाचे सर्वाधिक आकर्षण ठरले ते बालगोपालांनी मोठ्या उत्साहाने सजवून आणलेल्या नंदीबैलांचे. बालकांच्या कल्पकतेला, कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या नंदीबैल सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेत विविध रंग, फुले, कागद, आकर्षक वस्तू तसेच पारंपरिक साहित्याचा वापर करून नंदीबैल सजविण्यात आले होते. प्रत्येक बालकाने आपल्या कल्पकतेनुसार सजावट केल्याने संपूर्ण परिसर रंगीबेरंगी आणि उत्साहपूर्ण झाला होता. परीक्षकांनी प्रत्येक नंदीबैलाच्या सजावटीचे बारकाईने परीक्षण करून वयोगटानुसार विजेत्यांची निवड केली.
गट ‘अ’मध्ये आदिश्री शेट्टे हिने प्रथम क्रमांक पटकावला. श्रव गोलाईत याने द्वितीय, तर मायरा बुरांडे हिने तृतीय क्रमांक मिळविला. मानापुरे यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
गट ‘ब’मध्ये आर्य भुरसे याने प्रथम क्रमांक मिळविला. सानिध्य दूधबळे याने द्वितीय, तर निहाश पुण्यपरेड्डीवर याने तृतीय क्रमांक पटकावला. अंजना लाड यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
विजेत्या बालगोपालांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
*आमदारांच्या उपक्रमामुळे बालगोपालांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य*
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी स्वतःच्या वतीने नंदीबैल सजवून आणलेल्या सर्व बालगोपालांना ड्रॉईंग किटचे वाटप केले. या उपक्रमामुळे बालगोपालांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. पारंपरिक तान्हा पोळ्याला बालप्रतिभा आणि सर्जनशीलतेची जोड देणारा हा उपक्रम विशेष कौतुकाचा ठरला.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ. अशोक नेते आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तान्हा पोळ्यासारख्या पारंपरिक उत्सवांचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उत्सवांच्या माध्यमातून आपल्या संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण जीवनाशी असलेली नाळ पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिकतेच्या युगातही पारंपरिक सण-उत्सवांचे जतन करून त्यात बालकांचा सहभाग वाढविणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
*मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत*
कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिक, पालक आणि बालगोपालांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नंदीबैल सजावट स्पर्धा, पुरस्कार वितरण आणि मान्यवरांचा सत्कार यामुळे नगरपंचायत प्रांगणात दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका अॅड. प्रेमाताई आईंचवार यांनी केले. सूत्रसंचालन रमेश अधिकारी व नम्रता राजकोंडावार यांनी केले, तर आभार सामाजिक कार्यकर्ते अमोल आईंचवार यांनी मानले.
चामोर्शीतील यंदाचा तान्हा पोळा उत्सव हा केवळ पारंपरिक सण म्हणून न राहता संस्कृतीचे जतन, बालप्रतिभेला प्रोत्साहन, सामाजिक कर्तृत्वाचा गौरव आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यांचा सुंदर मिलाफ ठरला. त्यामुळे चामोर्शी शहरातील तान्हा पोळा उत्सवाची आगळीवेगळी ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
थोडे नवीन जरा जुने