मध्यरात्री धावली आरोग्य यंत्रणा; दुर्मीळ रक्त मिळालं अन् ८ वर्षीय आमिरचा जीव वाचला!
बी-निगेटिव्ह रक्ताचा तातडीने पुरवठा; हिमोग्लोबिन ४.५ वरून ९.२ ग्रॅमपर्यंत — अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेचा कौतुकास्पद समन्वय
राकेश तेलकुंटलवार उपसंपादक
महाराष्ट्र प्रहार न्यूज
गडचिरोली/एटापल्ली, १३ सप्टेंबर :
अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातील गट्टा परिसरातील गर्देवाडा आश्रमशाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकल्यावर मलेरियाने गंभीर स्वरूप धारण केले. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर त्याला दुर्मीळ ‘बी-निगेटिव्ह’ रक्तगटाची तातडीने गरज भासली. मध्यरात्री आरोग्य यंत्रणेने केलेल्या वेगवान हालचाली आणि विविध स्तरांवरील समन्वयामुळे अखेर चिमुकल्याला वेळेत रक्त मिळाले आणि त्याचे प्राण वाचविण्यात यश आले.
मेढरी येथील आमिर कवडो (वय ८) हा गर्देवाडा आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. त्याला २७ ऑगस्ट रोजी मिश्र प्रकारच्या मलेरियाचे निदान झाले होते. तीन दिवस उपचार घेतल्यानंतर पालकांच्या विनंतीवरून आश्रमशाळा प्रशासनाने त्याला घरी सोडले. मात्र, १ सप्टेंबर रोजी त्याला लघवीतून रक्तस्त्राव होण्यास सुरुवात झाली. प्रकृती सातत्याने खालावत गेल्याने अखेर आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्याला रात्री सुमारे १० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, गट्टा येथे दाखल करण्यात आले.
हिमोग्लोबिन अवघे ४.५; ऑक्सिजन पातळी ७३ टक्क्यांवर
गट्टा येथील प्राथमिक तपासणीत आमिरचे हिमोग्लोबिन अवघे ४.५ ग्रॅम असल्याचे आढळून आले, तर त्याची SpO₂ पातळी ७३ टक्क्यांवर घसरली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने ऑक्सिजन सपोर्ट सुरू केला आणि त्याला पुढील उपचारासाठी काली अम्मल रुग्णालय (LKAM), हेडरी येथे हलविण्याचा निर्णय घेतला.
मध्यरात्री रक्तासाठी धावपळ; २.३० वाजता मिळाली पहिली पिशवी
आमिरचा रक्तगट बी-निगेटिव्ह असल्याने त्याच्यासाठी रक्ताची उपलब्धता हे मोठे आव्हान बनले. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एटापल्लीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी तत्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधला.
आरोग्य यंत्रणेच्या या प्रयत्नांना यश आले आणि मध्यरात्री सुमारे २.३० वाजता बी-निगेटिव्ह रक्ताची पहिली पिशवी उपलब्ध करून देण्यात आली. आलापल्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लाडस्कर यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देत रक्त वेळेत रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यास महत्त्वाची मदत केली.
बालरोगतज्ज्ञांनी मागितल्या आणखी दोन रक्तपिशव्या
उपचारादरम्यान बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती यांनी आमिरची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन आणखी दोन रक्तपिशव्यांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे आणि जिल्हा हिवताप विभागाशी तातडीने समन्वय साधण्यात आला.
जिल्हा मुख्यालयातून आणखी दोन बी-निगेटिव्ह रक्तपिशव्या रुग्णवाहिकेद्वारे अहेरीमार्गे रुग्णालयात पोहोचविण्यात आल्या. अतिदुर्गम भागातील वाहतूक, अंतर आणि मध्यरात्रीची वेळ अशा अनेक अडचणी असतानाही आरोग्य यंत्रणेने दाखविलेल्या तत्परतेमुळे रक्ताचा पुरवठा वेळेत होऊ शकला.
हिमोग्लोबिन ४.५ वरून ९.२; चिमुकला धोक्याबाहेर
वेळेत मिळालेल्या तीन रक्तपिशव्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारांमुळे आमिरच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. त्याचा लघवीतील रक्तस्त्राव थांबला असून हिमोग्लोबिनची पातळी ४.५ वरून ९.२ ग्रॅमपर्यंत वाढली आहे. विशेष म्हणजे त्याला व्हेंटिलेटरची गरज भासली नाही. सध्या आमिरची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
अतिदुर्गम भागात आरोग्य यंत्रणेच्या समन्वयाचे कौतुक
आमिरच्या उपचारासाठी तालुका, उपजिल्हा आणि जिल्हा स्तरावरील आरोग्य यंत्रणेने दाखविलेली तत्परता आणि समन्वय कौतुकास्पद ठरला. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. माधव शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश नागोसे, डॉ. अनिकेत तिपटे, डॉ. लाडस्कर तसेच काली अम्मल रुग्णालय, हेडरी येथील वैद्यकीय चमूने अहोरात्र प्रयत्न केल्याने चिमुकल्याला नवजीवन मिळाले.
अतिदुर्गम भागात गंभीर परिस्थितीतही आरोग्य विभागाने दाखविलेली तत्परता आणि विविध यंत्रणांमधील प्रभावी समन्वय ‘वेळेवर उपचार आणि रक्तपुरवठा म्हणजेच जीवनदान’ याचा प्रत्यय देणारा ठरला आहे.
— डॉ. प्रताप शिंदे
जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली
Tags:
आरोग्य विभाग