एटापल्ली आठवडी बाजारात मलेरिया-डेंग्यू जनजागृती अभियान
माडीया, गोंडी भाषेतील जिंगल्सद्वारे नागरिकांना प्रतिबंधात्मक उपायांची माहिती
एटापल्ली, दि. २९ सप्टेंबर (उपसंपादक /राकेश तेलकुंटलवार) : तालुका आरोग्य अधिकारी, एटापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली येथील आठवडी बाजार परिसरात मलेरिया, डेंग्यूसह इतर कीटकजन्य आजारांबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. स्थानिक नागरिकांना त्यांच्या भाषेत आरोग्यविषयक माहिती देण्यासाठी माडीया व गोंडी भाषेतील जनजागृतीपर जिंगल्सचा वापर करण्यात आला.
अभियानादरम्यान बाजारात आलेल्या नागरिकांना मलेरिया व डेंग्यूची लक्षणे, आजारांची कारणे तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली. घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, परिसर स्वच्छ ठेवणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे तसेच ताप आल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
एटापल्ली परिसरातील नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक संदेश प्रभावीपणे पोहोचावा यासाठी माडीया व गोंडी भाषेतील जिंगल्स वाजविण्यात आले. स्थानिक भाषेतून माहिती देण्यात आल्याने नागरिकांना मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधाबाबत समजावून सांगण्यास मदत झाली.
मलेरिया व डेंग्यू नियंत्रणासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून, परिसरातील स्वच्छता राखणे आणि डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी CHO सोनू वड्डे, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, तालुका कीटकशास्त्रज्ञ श्री. श्रावण राठोड, सोनाली कोराम (TCI), बंडू दामले, तालुका समन्वयक–मलेरिया, CHAI Foundation तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांनी ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, अंगदुखी यांसारखी लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधून आवश्यक तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
Tags:
आरोग्य विभाग