संवेदीकरण व एचआयव्ही / एड्स जनजागृती: भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन
एटापल्ली:
स्थानिक भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय, एटापल्ली येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने 'इंटेन्सिफाइड आयईसी कॅम्पेन' (Intensified IEC Campaign) अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संवेदीकरण व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथील आयसीटीसी समुपदेशक (ICTC Counsellor) रश्मी मारगमवार यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रश्मी मारगमवार यांनी एचआयव्ही (HIV) आणि एड्स (AIDS) या विषयावर सविस्तर माहिती दिली. एचआयव्ही संसर्गाची कारणे, त्याचा प्रसार रोखण्याचे उपाय, उपचारांची उपलब्धता आणि समाजात या आजाराबद्दल असणारे गैरसमज दूर करणे किती गरजेचे आहे, यावर त्यांनी भर दिला. युवा पिढीने आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा आणि या विषयाबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. सुधीर भगत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डाॅ. विनोद पत्तीवार, प्रा डाॅ. विश्वनाथ दरेकार, प्रा. डॉ. निलेश दुर्गे, प्रा. डाॅ. श्रृती गुब्बावार, प्रा. स्वाती तंतरपाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राहुल ढबाले यांनी केले तर आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदिप मैंद यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते.