धारदार शस्त्राने डोक्यात वार; वाघोली शिवारात अनोळखी इसमाचा निर्घृण खून
चामोर्शी-मुल मार्गावर मृतदेह आढळल्याने खळबळ; मृताची ओळख अद्याप गुलदस्त्यात, आरोपीचा शोध सुरू
चामोर्शी : चामोर्शी-मुल मार्गावरील वाघोली शिवारात एका अनोळखी इसमाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवार, ७ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आली. रस्त्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृताची अद्याप ओळख पटलेली नसून, या खुनामागील नेमके कारण काय आणि हा प्रकार कोणी केला, याचा तपास चामोर्शी पोलीस करीत आहेत.
चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा वाघोली शिवारात चामोर्शी-मुल रोडपासून सुमारे १०० मीटर अंतरावर रात्री १० वाजण्याच्या सुमारास अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील एका इसमाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात त्याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मृत इसमाची उंची अंदाजे साडेपाच फूट असून रंग गोरा व शरीरयष्टी सडपातळ आहे. त्याने काळ्या रंगाचा शर्ट आणि खाकी रंगाची पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या गळ्यात चांदीची चैन, डाव्या हातात काळ्या रंगाचे घड्याळ तसेच पायात पॅरागॉन कंपनीच्या प्लास्टिक चप्पल आढळून आल्या आहेत. या वर्णनावरून मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची दिशा निश्चित केली असून, खुनामागील कारणाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मृत व्यक्ती कोण आहे, तो वाघोली शिवारात कसा पोहोचला आणि त्याचा खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
दरम्यान, मृताची ओळख पटविणे हे तपासातील महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, परिसरातील तसेच आसपासच्या पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून विविध स्तरावर तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत.
मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
वरील वर्णनाशी मिळताजुळता इसम आपल्या परिसरातून बेपत्ता असल्यास किंवा या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ चामोर्शी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.