भूपती यांची नियुक्ती कायम ठेवा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी


भूपती यांची नियुक्ती कायम ठेवा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी 

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या एकल उपक्रमाचे समन्वयक म्हणून आत्मसमर्पित नक्षलवादी मल्लोजुलू वेणूगोपाल राव उर्फ भूपती यांच्या झालेल्या नियुक्तीला काही संघटनांनी विरोध करुन सदर नियुक्ती रद्द करण्याची केलेली मागणी द्वेष भावनेतून असून भूपती यांची नियुक्ती राजकीय दडपणाखाली रद्द न करता कायम ठेवावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केली आहे.


गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू यांना लिहिलेल्या पत्रात भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, गडचिरोली सह देशभरात आदिवासींच्या जल, जंगल, जमीनच्या हक्क आणि अधिकारांसाठी सक्रिय राहिलेल्या नक्षल चळवळीमुळे पोलीस जवान, निरपराध नागरिक आणि आदिवासी असलेल्या नक्षल अशा हजारोंचे कुटुंब उध्वस्त झाले. हा सशस्त्र संघर्ष देशाच्या भविष्यासाठी नेहमीच धोकादायक राहिला. मात्र मागील काही वर्षांपासून नक्षल चळवळीतील कार्यकर्त्यांनी शस्त्राचा त्याग करून लोकशाही मार्ग स्वीकारला आणि सध्या गडचिरोली सह देशभरातून नक्षल चळवळ संपुष्टात आली ही समाधानकारक बाब आहे. हे केवळ सरकारच्या व्यापक आत्मसमर्पण नितीमुळे शक्य झाले आहे. 

गडचिरोलीत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल कार्यकर्त्यांमध्ये भूपती उर्फ मल्लोजुलू वेणुगोपाल राव यांना आत्मसमर्पणोत्तर जीवन सन्मानाने जगण्याचा विश्वास शासनाने दिला होता. त्यानुसार गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या एकल उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम करण्याची दिलेली संधी हे शासनाने आत्मसमर्पण नितीनुसार पाळलेले सर्वोच्च उदाहरण असून कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक दडपणाखाली सदरची नियुक्ती रद्द करण्याचे कारण आम्हाला वाटत नाही, असे भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे.

भूपती यांच्या नियुक्तीला विरोध करणाऱ्यांमध्ये एकतर ते लोकं आहेत ज्यांनी भूपती सारख्या नक्षलवाद्यांचे आम्ही कॅडर केलेले आहेत, त्यांच्या जवळचे आहोत असे सांगून आपल्या गावात, इलाख्यात आपले प्रस्थ वाढवून तेंदू, बांबू आणि बांधकाम ठेकेदार यांच्या कडून वसूली करून नक्षलवाद्यांना मदत पोहचवून द्यायचे आणि काही रक्कम स्वतःच्या खिशात भरायचे. आता नक्षलचळवळ मोडीत निघाल्याने वसूली धंदे बंद होतील म्हणून नक्षलवादी चळवळ सुरूच राहावी असे वाटणारे व ग्रामसभांवर आपला वचक ठेवून स्वतः ची कमीशनखोरी आणि नेतागिरी कायम ठेवू इच्छिणारे आहेत. आणि दुसरे ते लोकं आहेत ज्यांना आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ उभारता आली नसल्यामुळे वैफल्यग्रस्त आहेत असा घणाघाती आरोपही भाई रामदास जराते यांनी या पत्रात केला आहे.

एक ब्राम्हण समाजातील असतांनाही भूपतीसारख्याने हजारो आदिवासींना एकत्र आणून गेली ४० वर्षे शासनाविरोधात चुकीच्या मार्गाने का होईना पण सातत्याने संघर्ष केला. खरं तर जल, जंगल, जमीन, ग्रामसभा, पेसा, वनाधिकार कायद्याच्या संदर्भात गोंडवाना विद्यापीठाने सुरू केलेल्या उपक्रमाचा समन्वयक म्हणून भूपती उर्फ मल्लोजुलू वेणुगोपाल राव यांच्या व्यतिरिक्त दोन - चार सोडले तर गडचिरोली जिल्ह्यात सध्यातरी फार कोणी लायक असल्याचे आम्हाला वाटत नाही. स्वतःच्या पद - प्रसिद्धीसाठी आणि शासनाचा अनुदान लाटण्यासाठी किंवा कागदी डिग्री मिरविणाऱ्यांपेक्षा गेली ४० वर्षे मध्य भारतातील डोंगरदऱ्यांतील आदिवासींच्या संस्कृती आणि जगण्या - मरणाशी कोणत्याही स्वार्थाशिवाय जवळीक असलेल्या आणि आदिवासींच्या जल जंगल जमीनीच्या हक्क - अधिकारांसाठी दिर्घकालीन वेळ घालवलेल्या अभ्यासकाला शासनाने संधी दिली याबद्दल भाई रामदास जराते यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

भूपती उर्फ मल्लोजुलू वेणुगोपाल राव यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यातील नव्या पिढीला जल, जंगल, जमीन आणि नैसर्गिक संसाधनांच्या व्याप्तीचा अभ्यास करण्याची संधी आणि दिशा मिळेल असा आशावाद आम्हाला वाटत आहे. त्यामुळे शासनाने कोणत्याही परिस्थितीत अथवा राजकीय, सामाजिक दबावामुळे भूपती उर्फ मल्लोजुलू वेणुगोपाल राव यांची नियुक्ती रद्द करु नये अशी मागणीही भाई रामदास जराते यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने केली आहे.
थोडे नवीन जरा जुने