जिल्हा गौरव पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते महेश मोहूर्ले सन्मानित
‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ सादरीकरण व जिल्हा गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात
राकेश तेलकुंटलवार उपसंपादक
महाराष्ट्र प्रहार न्यूज
एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधून २०४७ पर्यंत जिल्ह्याला प्रगतीच्या शिखरावर नेण्याच्या संकल्पनेतून ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ सादरीकरण व संबोधन कार्यक्रम तसेच जिल्हा वर्धापन दिनानिमित्त ‘जिल्हा गौरव पुरस्कार वितरण सोहळा’ २६ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला.
भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने ‘व्हिजन गडचिरोली २०४७’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आगामी २५ वर्षांत गडचिरोली जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने साधता येईल, नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, तसेच जल, जमीन, जंगल आणि मानवी संसाधनांचा योग्य वापर करून शाश्वत विकास कसा घडवून आणता येईल, यावर कार्यक्रमात विचारमंथन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, अभ्यासू नागरिक तसेच वृत्तपत्र, दूरदर्शन आणि डिजिटल माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यातील योगदानाची दखल
गडचिरोली जिल्ह्याच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘जिल्हा गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये एटापल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माळी समाजाचे तालुका अध्यक्ष बंटी उर्फ महेश मोहूर्ले यांचा विशेष गौरव करण्यात आला.
सामाजिक व विकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते महेश मोहूर्ले यांना ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. दुर्गम व सीमावर्ती एटापल्ली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्याला जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याने ही बाब तालुक्यासाठी अभिमानाची ठरली आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर एटापल्ली परिसरातून बंटी उर्फ महेश मोहूर्ले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या सामाजिक कार्याला मिळालेली ही पावती असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Tags:
सन्मान