खड्ड्यांतून जीवघेणा प्रवास! अहेरी-इंदाराम रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कंकडालवार आक्रमक

खड्ड्यांतून जीवघेणा प्रवास! अहेरी-इंदाराम रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कंकडालवार आक्रमक

सात दिवसांत काम सुरू करा, अन्यथा खड्ड्यांत धान रोवणी करून चक्काजाम; कंकडालवार यांचा इशारा

अहेरी : अहेरी-इंदाराम तसेच व्येकटापूर-आवलमरी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांसह प्रवासी आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केला आहे.

या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी कंकडालवार यांनी आलापल्ली बांधकाम विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहे. त्यामुळे वाहनांची मोठी गैरसोय होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

अहेरी, इंदाराम, व्येकटापूर आणि आवलमरी परिसरातील नागरिकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. दररोज या मार्गावरून विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पावसाळ्यात प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

सात दिवसांची मुदत

रस्त्याच्या बांधकाम व दुरुस्तीच्या कामाला येत्या सात दिवसांच्या आत सुरुवात करावी, अशी मागणी कंकडालवार यांनी केली आहे. या कालावधीत काम सुरू न झाल्यास रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये धानाची रोवणी करून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता संबंधित विभागाने आता तरी दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
थोडे नवीन जरा जुने