विभाजन विभिषिका स्मृती दिन देशाच्या एकतेचा,अखंडतेचा संकल्प करण्याचा दिन :- व्याख्याते दुधबावरे
आज आपण इतिहासाच्या एका अशा पानासमोर उभे आहोत, ज्यावर स्वातंत्र्याच्या आनंदाबरोबरच लाखो लोकांच्या अश्रूंचे डाग आहेत. १४ ऑगस्ट हा दिवस समस्त भारतीयांना "विभाजन विभीषिका स्मृती दिन” म्हणून त्या वेदनादायी इतिहासाची आठवण करून देते.
परंतु त्या स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी भारतीय उपखंडाच्या इतिहासात देशाच्या फाळणीची एक अत्यंत वेदनादायक घटना घडली असे प्रतिपादन युवा व्याख्याते व स्तंभलेखक तुषार दुधबावरे यांनी केले.
ॲड. मंगल प्रभात लोढा कॅबिनेट मंत्री कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय,महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून आयोजित 'टिपागड गुरुबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धानोरा' येथे प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते.
'विभाजन विभिषिका स्मृती दिन हा दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी पाळला जातो. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीदरम्यान झालेल्या वेदना आणि हिंसाचाराच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. केंद्र व राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागांतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
फाळणीच्या काळात पंजाब, बंगाल आणि इतर भागांत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली.अनेक मुलांनी आपल्या आई-वडिलांना गमावले.अनेक महिलांवर अमानुष अत्याचार झाले. इतिहासकारांच्या अंदाजानुसार फाळणीच्या काळात कोट्यवधी लोकांचे विस्थापन झाले आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली.
म्हणून फाळणी ही केवळ राजकीय सीमा आखण्याची घटनाच नव्हती तर ती एक मानवी शोकांतिका होती. असेही ते बोलले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आयटीआय चे प्राचार्य श्री मधूपवार हे होते. देशाची सीमा कागदावर आखली गेली व त्या रेषेने केवळ जमीन विभागली गेली नाही तर त्या रेषेने—कुटुंबे विभागली, गावे विभागली, शेती विभागली, आठवणी विभागल्या असे ते यावेळी बोलत होते. यावेळेस मंचावर निदेशिका सौ मनीषा बंडराखे हे होते.
केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शन तत्त्वानुसार कार्यक्रमाची सुरुवात 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताने झाली व कार्यक्रमाची सांगता 'जण गण मन' या राष्ट्रगीताने झाली हे विशेष.
यावेळेस निदेशिका धुरात,निदेशक आशिष म्हशाखेत्री, निदे.सौरभ मेश्राम, निदे प्रीतम येटेवार, निदे पिंटू उसेंडी व इतर शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन निदेशिका कु गायत्री हिंगवे यांनी केले.