अवैध गोवंश वाहतुकीवर गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

अवैध गोवंश वाहतुकीवर गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई

३२ गोवंशीय जनावरांसह दोन चारचाकी वाहने जप्त; १९ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

गडचिरोली, दि. २९ ऑगस्ट २०२६ : गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली असून, आरमोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा व आरमोरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत ३२ गोवंशीय जनावरे, दोन चारचाकी वाहने व तीन मोबाईल फोन असा एकूण १९ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २६ गायी व ६ बैलांचा समावेश असून, वैद्यकीय तपासणीत ४ गायी व २ बैल अशी एकूण ६ जनावरे मृत आढळून आली.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांसह अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २८ ऑगस्ट रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरमोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना गोपनीय बातमीदारामार्फत गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार मौजा ठाणेगाव आरमोरी टी-पॉईंट परिसरात पोलिसांनी सापळा रचला. यावेळी दोन पायलटिंग वाहने आणि संशयित आयसर वाहन क्रमांक एमएच ०४ जीआर ०३८४ येताना दिसले. पोलिसांनी आयसर वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयपणे कोंबून भरल्याचे आढळून आले.

वाहनातील दोघांनी जंगलाच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून प्रणय समीर जांभुळकर (वय २०, रा. आंधळी, ता. कुरखेडा) याला ताब्यात घेतले.

दरम्यान, पायलटिंग करणाऱ्या काळ्या रंगाच्या क्रेटा वाहनाला थांबविण्याचा इशारा दिला असता त्याचा चालक वाहन न थांबविता फरार झाला. त्याच्या मागे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक सीजी १० एएम ८४१५ ला पोलिसांनी अडविले. या वाहनातील तिघांनीही जंगलाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये शेहबाज सलाम शेख (वय ३१, रा. विवेकानंद नगर, गडचिरोली), शोहेब फारुक शेख (वय २७) आणि शेख आकिब नासीर शेख (दोघेही रा. जाफरनगर, नागपूर) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी केलेल्या पंचनामा व तपासणीत आयसर वाहनामध्ये २६ गायी व ६ बैल, अशी एकूण ३२ जनावरे आढळली. त्यांची अंदाजे किंमत ५ लाख ९५ हजार रुपये आहे. याशिवाय आयसर वाहनाची किंमत सुमारे १० लाख रुपये, स्विफ्ट डिझायरची किंमत सुमारे ३ लाख रुपये व तीन मोबाईल फोन असा एकूण १९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीत फरार आरोपी शहजाद शेख, रा. कुरखेडा व जमील कुरेशी, रा. गेवर्धा, जि. गडचिरोली यांच्या सांगण्यावरून जनावरांनी भरलेल्या आयसर वाहनाची पायलटिंग केली जात असल्याची माहिती समोर आली.

या प्रकरणी आरमोरी पोलिस ठाण्यात अप. क्र. ३८०/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात शेहबाज सलाम शेख, शोहेब फारुक शेख, शेख आकिब नासीर शेख व प्रणय समीर जांभुळकर या चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर शहजाद शेख, जमील कुरेशी व आयसर वाहनाचा अज्ञात चालक यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कांबळे, आरमोरी पोलिस ठाणे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे व आरमोरीचे पोलीस निरीक्षक सचिन झनक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
थोडे नवीन जरा जुने