कुरखेडा पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई


कुरखेडा पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई

देशी-विदेशी दारूसह चारचाकी जप्त; २ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात

कुरखेडा, दि. २९ ऑगस्ट २०२६ : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही छुप्या पद्धतीने अवैध देशी-विदेशी दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार कुरखेडा पोलिसांनी सापळा रचून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत देशी-विदेशी दारू व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी असा एकूण २ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दि. २७ ऑगस्ट रोजी कुरखेडा पोलिसांचे पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून वडसा-कुरखेडा मार्गावर पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून अवैध देशी व विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी वडसा-कुरखेडा मार्गावर तात्पुरता अडथळा निर्माण करून वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी संशयित पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन येताना दिसताच पोलिसांनी ते थांबविले. वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सौरभ संतोष डहाळे (वय २५, रा. चिखली, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली) असे सांगितले.

पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारू संत्री कंपनीचे २० बॉक्स, प्रत्येकी १०० नग याप्रमाणे एकूण २ हजार नग, किंमत १ लाख २० हजार रुपये आढळले. तसेच रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारूचे २ बॉक्स, प्रत्येकी ४८ नग याप्रमाणे ९६ नग, किंमत ३८ हजार ४०० रुपये, तर सह्याद्री गोल्ड कंपनीच्या विदेशी दारूचा १ बॉक्स, एकूण ४८ नग, किंमत १९ हजार २०० रुपये असा दारूसाठा आढळून आला.

याशिवाय अवैध दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी रिट्झ कार क्रमांक एमएच १२ एनबी २०८५, अंदाजे किंमत १ लाख रुपये, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दारू व वाहनाची एकत्रित किंमत २ लाख ७७ हजार ६०० रुपये आहे.

पोलिसांनी सौरभ डहाळे याच्याकडे अधिक चौकशी केली असता, जप्त करण्यात आलेला दारूसाठा मोहन लांजेवार (वय ४२, रा. केशोरी, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) याचा असल्याचे त्याने सांगितले.

या प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात अप. क्र. १९३/२०२६, कलम ६५ (अ), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये सौरभ संतोष डहाळे व मोहन लांजेवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक कुणाल रेगूलवार, पोलीस हवालदार संतोष कांबळे व चामपोशी अरुणा लोहंबरे यांनी केली.
थोडे नवीन जरा जुने