पोर्णिमा श्रीरामवार, सौ. सुनिता चांदेकर यांचा ‘जिल्हा गौरव’ पुरस्काराने सन्मान!

सौ.पोर्णिमा श्रीरामवार, सौ. सुनिता चांदेकर यांचा ‘जिल्हा गौरव’ पुरस्काराने सन्मान!

‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ सोहळ्यात एटापल्लीच्या महिलांचा गौरव; सामाजिक कार्याची जिल्हास्तरावर दखल

राकेश तेलकुंटलवार/उपसंपादक 
एटापल्ली 

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाचा संकल्प घेऊन आयोजित करण्यात आलेल्या ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ सादरीकरण व संबोधन कार्यक्रमात एटापल्लीच्या सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. जिल्हा वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित भव्य ‘जिल्हा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्या’त सौ. पोर्णिमा श्रीरामवार आणि सौ. सुनिता मोहन चांदेकर यांना सामाजिक व विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘जिल्हा गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दुर्गम व आदिवासीबहुल एटापल्ली तालुक्यात सामाजिक कार्याच्या माध्यमातून उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा जिल्हास्तरावर गौरव झाल्याने एटापल्लीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मिळालेला हा सन्मान तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

‘व्हिजन गडचिरोली २०४७’मधून विकासाचा संकल्प

भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने ‘व्हिजन गडचिरोली २०४७’ या दूरगामी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आगामी २५ वर्षांत गडचिरोली जिल्ह्याचा चेहरामोहरा कसा असावा, नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, तसेच जिल्ह्यातील जल, जमीन, जंगल आणि मानवी संसाधनांचा योग्य वापर करून शाश्वत विकास कसा साधता येईल, यावर कार्यक्रमात सविस्तर विचारमंथन करण्यात आले.

या कार्यक्रमाला सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, अभ्यासू नागरिक तसेच वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एटापल्लीच्या महिलांच्या कार्याचा जिल्हास्तरीय गौरव

सामाजिक आणि विकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सौ. पोर्णिमा श्रीरामवार आणि सौ. सुनिता मोहन चांदेकर यांना मिळालेला ‘जिल्हा गौरव’ पुरस्कार हा एटापल्ली तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

पुरस्काराची घोषणा होताच एटापल्ली परिसरातून दोन्ही मान्यवरांवर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुर्गम भागातील महिलांच्या सामाजिक योगदानाला मिळालेली ही जिल्हास्तरीय दखल आगामी काळात इतर महिलांनाही सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देणारी ठरणार आहे.
थोडे नवीन जरा जुने