गणपूर केंद्राची दुसरी शिक्षण परिषद उत्साहात
शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर मार्गदर्शन
गणपूर (रे.), २८ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली चक नं. १ येथे गणपूर केंद्राची दुसरी शिक्षण परिषद २७ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात पार पडली. केंद्रप्रमुख कपिल सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परिषदेत शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
परिषदेत ‘शिक्षण निपुण महाराष्ट्र’, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी, अध्ययन निष्पत्तीवर आधारित पाठाचे नमुना सादरीकरण, यशोगाथा व ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’चे सादरीकरण करण्यात आले. तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केंद्रनिहाय कृती आराखडा, शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा कार्यक्रमाचा आढावा, समस्या निराकरण, DIKSHA Courses आणि AI संदर्भातील माहिती देण्यात आली.
मूल्यवर्धन सत्राच्या परिणामकारक अंमलबजावणीसह नवभारत साक्षरता अभियान आणि आनापान ध्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, मानसिक शांतता व सकारात्मक विचारसरणी विकसित करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत मुधोलीचे उपसरपंच दिलीप वर्धलवार होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक शेडमाके, नामदेव वर्धलवार, संजय शेडमाके, विशेष शिक्षक रवीभाऊ खेवले यांच्यासह केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
शिक्षकांनी विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण करून अनुभवांची देवाणघेवाण केली. त्यामुळे परिषद शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी दिशादर्शक ठरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक देवराव वर्धलवार यांनी केले. आभार संतोष नागरगोजे यांनी मानले. शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गणपूर केंद्राची दुसरी शिक्षण परिषद यशस्वीरीत्या संपन्न झाली.
Tags:
शिक्षण विभाग