रामकृष्णपूर येथे जुगार अड्ड्यावर आष्टी पोलिसांचा छापा
११ जणांवर गुन्हा; ९ दुचाकींसह ४ लाख २ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
आष्टी : रामकृष्णपूर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आष्टी पोलिसांनी धडक कारवाई करत ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या या कारवाईत रोख रक्कम, जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे तासपत्ते तसेच नऊ दुचाकी वाहने असा एकूण ४ लाख २ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २.१० ते ३ वाजण्याच्या दरम्यान रामकृष्णपूर, आष्टीपासून सुमारे १७ किलोमीटर उत्तर दिशेला असलेल्या परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुखबिराकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी घेराव घालून छापा टाकला.
या कारवाईदरम्यान घटनास्थळी जुगार खेळला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत जुगारासाठी वापरण्यात येणारे तासपत्ते, रोख रक्कम तसेच घटनास्थळी असलेल्या नऊ दुचाकी ताब्यात घेतल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४,०२,२०० रुपये असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
या प्रकरणी पोलीस ठाणे आष्टी येथे अपराध क्रमांक २९१/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत रतन सुशील मंडल (४५), सुब्रजीत सत्यचरण बिश्वास (३४), हिमांशु हृदय सरदार (५८), बिक्रमजीत विश्वनाथ सरकार (३९), बिजय विश्वनाथ सरकार (४१), प्रबिन फनिद्र मंडल (४६), गौतम ज्ञानेंद्र बिश्वास (४५), सरोजीत जतिन सरकार (३६), रंजित कालीपत सरकार (४९), आशुतोष महादेव बिश्वास (४५) आणि सुषमय खगेन बिश्वास (४३), सर्व रा. रामकृष्णपूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास पोहवा/२३१० जितेंद्र ए. मुनघाटे, पोलीस ठाणे आष्टी, करीत आहेत.
पोलिसांच्या धडक कारवाईने जुगार अड्ड्यांमध्ये खळबळ
रामकृष्णपूर परिसरात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व्यवसायाला चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, एका कारवाईत तब्बल नऊ दुचाकींसह चार लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त झाल्याने या कारवाईची परिसरात चर्चा आहे.