बंडूभाऊ कुळवे रिपाईच्या चामोर्शी तालुकाध्यक्षपदी

बंडूभाऊ कुळवे रिपाईच्या चामोर्शी तालुकाध्यक्षपदी

पक्षविस्तारासह वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार

चामोर्शी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाई) चामोर्शी तालुकाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ कुळवे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी कुंभे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी चामोर्शी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची चिमूर लोकसभा क्षेत्रासह गडचिरोली जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी सुरू असून, पक्षाला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची साथ मिळत असल्याचे प्रा. बोरकर यांनी सांगितले. नुकत्याच गडचिरोली येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात असंख्य कार्यकर्त्यांनी रिपाईमध्ये प्रवेश केल्याचा दावाही त्यांनी केला.

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये रिपाईच्या शाखा कार्यरत असून, ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या भूमिकेतून पक्ष बहुजन आणि वंचित घटकांच्या विविध प्रश्नांसाठी कार्यरत असल्याचे प्रा. बोरकर यांनी स्पष्ट केले.

तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर बंडूभाऊ कुळवे यांनी “रिपाईच्या माध्यमातून वंचित घटकांची सेवा करण्यासोबतच चामोर्शी तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असा निर्धार व्यक्त केला.

यावेळी रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे, मारोती भैसारे, घोट सर्कल प्रमुख विशाल दहिवले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने