मुलचेरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा : शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुलचेरा : मुलचेरा तालुका हा मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असलेला आदिवासी व ग्रामीण तालुका आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतीवशेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. चालू खरीप हंगामामध्ये पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्यामुळे नापिक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने मुलचेरा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या मुलचेरा तालुका समितीने केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील परिस्थितीचा शासनाच्या संबंधित यंत्रणांमार्फत तातडीने पर्जन्यमान, पीक परिस्थिती, पेरणीक्षेत्र, पीक नुकसान, उपलब्ध पाणीसाठा, भूजलपातळी व पीक उत्पादकता या निकषांवर सर्वंकष पंचनामा व वस्तुनिष्ठ पाहणी करण्यात यावी. व दुष्काळ घोषित करून शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई, कृषी निविष्ठा मदत, पिकांसाठी आवश्यक पाणीपुरवठा, वीजबिल व महसूल सवलती, कर्जविषयक सवलती तसेच इतर पात्र दुष्काळी मदतीचा लाभ तातडीने देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे तालुक्यात गंभीर परिस्थिती निर्माण होणार असून पिण्याच्या पाण्याची तसेच पशुधनासाठी पाण्याची आवश्यक व्यवस्था करावी. शेतकऱ्यांना चारा व पशुधनासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी. कृषी पंपांसाठी आवश्यक वीज पुरवठा सुरळीत ठेवून शेतकऱ्यांना वीज बिलासंबंधी शासनाच्या नियमानुसार सवलत द्यावी. पीक कर्ज व इतर कृषी कर्जाबाबत शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांच्यासह जगन्नाथ आत्राम, रविन मंडल, साईनाथ उरेते, दामा कडते, सुधाकर घोडाम, मिथुन कुळमेथे, अरुण कन्नाके, बालाजी सिडाम, भैय्याजी नैताम, अनिल गावडे, आनंदराव आत्राम, भास्कर सेडमाके, सुरेश कुळमेथे, रविंद्र तोरे, भास्कर राऊत, भास्कर मडावी, मंगामी आलाम, शंकर मडावी, शिवराम कुसनाके, रामदास कठबाळे, किशन कुमरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.