अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेचा धडाका!

अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेचा धडाका!

गोवंश तस्करी, अवैध दारू वाहतूक अन् मटका जुगारावर एकाचवेळी कारवाई; 29.41 लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली, दि. 7 : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाईची मोहीम राबवित गोवंश तस्करी, अवैध देशी-विदेशी दारू वाहतूक आणि मटका जुगारावर कारवाई केली. आरमोरी, चामोर्शी आणि कोरची पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत वाहने, गोवंश, दारू व रोख रकमेसह एकूण 29 लाख 41 हजार 115 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी 6 व 7 ऑक्टोबर रोजी विविध ठिकाणी कारवाई केली.
आरमोरीत 25 गोवंशांची निर्दयी वाहतूक; 15.18 लाखांचा मुद्देमाल जप्त
आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 ऑक्टोबर रोजी रात्री गस्तीदरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व आरमोरी पोलिसांनी देऊळगाव जिल्हा परिषद शाळेजवळ सापळा रचला. यावेळी आरमोरीकडून गडचिरोलीच्या दिशेने येणारा लाल रंगाचा आयशर ट्रक संशयास्पदरीत्या आढळून आला.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 25 गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयीपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत 25 गाय-बैलांची अंदाजे किंमत 3 लाख 18 हजार रुपये, तर आयशर वाहनाची किंमत सुमारे 12 लाख रुपये, असा एकूण 15 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वैद्यकीय तपासणीत 25 पैकी दोन गायी व एका बैलाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.
या प्रकरणी योगेश आनंदराव मडावी (35, रा. देवरी, जि. गोंदिया) आणि प्रमोद राजकुमार मोहबे (43, रा. आमगाव, जि. गोंदिया) यांच्याविरुद्ध आरमोरी पोलीस ठाण्यात अप. क्र. 468/2026 अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चामोर्शीत अवैध दारू वाहतूक पकडली; 9.18 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नागपूरहून ब्रह्मपुरीमार्गे गडचिरोली जिल्ह्यात अवैध देशी-विदेशी दारू आणली जात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार खरपुंडी नाका ते इंदिरा गांधी चौक परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांना पाहताच संशयित वाहनचालकाने वाहन पळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून देवडी बसस्टॉपजवळ नाकाबंदी करत वाहन पकडले.
वाहनाच्या झडतीत रॉकेट देशी दारूचे 21 बॉक्स व 100 प्लास्टिक बाटल्या, अंदाजे 4 लाख 8 हजार रुपये किमतीच्या, तसेच टोयोटा इनोव्हा वाहन (5 लाख रुपये) आणि मोबाईल (10 हजार रुपये) असा एकूण 9 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी चेतनसिंग बबुसिंग चंदेल (40, नागपूर) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने ही दारू प्रमोद मेश्राम, रा. गडचिरोली यांच्या सांगण्यावरून वाहतूक केल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. चामोर्शी पोलीस ठाण्यात अप. क्र. 517/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रमोद मेश्राम हा पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
कोरचीत मटका अड्ड्यावर छापा; 5,115 रुपये जप्त
कोरची पोलीस ठाण्याच्या हद्दीतही स्थानिक गुन्हे शाखेने मटका जुगाराविरोधात कारवाई केली. कोरची येथील एका पडक्या झोपडीत कल्याण व मणिपूर मटका जुगारावर आकडे लावून पैशांची खायवाडी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीच्या आधारे छापा टाकला असता हमीद खॉ दादाखॉ पठाण (55, रा. कोरची) हा संशयास्पदरीत्या आकडे लिहीताना व पैसे स्वीकारताना आढळून आला. त्याच्याकडून 5,010 रुपये रोख व इतर साहित्य, असा एकूण 5,115 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात अप. क्र. 137/2026, कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
या सर्व कारवाया पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा व अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज. जी. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, आरमोरीचे पोलीस निरीक्षक सचिन झनक, कोरचीचे पोलीस निरीक्षक दिपक डोंब, चामोर्शीचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत, पोलीस उपनिरीक्षक विश्वंबर कराळे, आरमोरीचे पोलीस उपनिरीक्षक शुभम शिंदे तसेच पोलीस अंमलदारांनी ही कारवाई केली.
अवैध धंदे, गोवंश तस्करी, दारूची अवैध वाहतूक आणि जुगाराविरोधातील कारवायांमुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
थोडे नवीन जरा जुने