बंडूजी कुडवे यांची आरपीआयच्या चामोर्शी तालुकाध्यक्षपदी निवड
सामाजिक कार्यातून पक्षसंघटन मजबूत करण्याचा निर्धार; नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांचा सत्कार...
तालुका प्रतिनिधी चामोर्शी :-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी कुंभे यांच्या आदेशानुसार तसेच गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या उपस्थितीत चामोर्शी येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते बंडूजी कुडवे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या चामोर्शी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीची अधिकृत घोषणा चामोर्शी येथे आयोजित पक्षाच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केली.
नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष बंडूजी कुडवे यांचा यावेळी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीमुळे चामोर्शी तालुक्यात पक्षाचे संघटन अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्यावर प्रकाश टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करण्यासाठी पक्ष सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. युवा पिढीमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याबरोबरच बहुजन समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित चामोर्शी तालुकाध्यक्ष बंडूजी कुडवे यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. आरपीआयच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित व गरजू घटकांची प्रामाणिकपणे सेवा करण्यास आपले प्राधान्य राहील, असे त्यांनी सांगितले. चामोर्शी तालुक्यात पक्षाचे संघटन गावागावांत मजबूत करून अधिकाधिक कार्यकर्त्यांना पक्षाच्या विचारांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संघटनात्मक काम अधिक गतिमान करण्याचा निर्धारही कुडवे यांनी व्यक्त केला. समविचारी पक्षांसोबत युती करून निवडणुका लढविण्याच्या दृष्टीने पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार काम केले जाईल, तसेच पक्षवाढीसाठी आपण कटिबद्ध राहू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला आरपीआयचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर, जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे, बन्सोडताई, प्रकाश सहारे, धिरज उराडे सर, नगरपंचायतीचे उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. रत्नाकर बोमीडवार, कालिदास बन्सोड, अयाज शेख, गजानन बारसागडे, चंद्रकांत कुनघाडकर, अमित साखरे, नरेश सोमनकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बंडूजी कुडवे यांच्या चामोर्शी तालुकाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल चंद्रगुप्त झाडे, मंगला वालदे, वर्षा सहारे, एच. एस. उंदीरवाडे, अॅड. सहारे, नवीन मेश्राम, धनराज गवारे, बंडू देवारे, हस्ते भगत, गोविंद लोळे, केशवजी खंडाळे, संगम उंदीरवाडे, सारंग भसारकर, किशोर कुडवे, संघशील सहारे, युवराज सहारे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कालिदास बन्सोड सर यांनी केले, तर आभार अमित साखरे यांनी मानले. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांना शुभेच्छा देत आगामी काळात चामोर्शी तालुक्यात पक्षाचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.
Tags:
राजकारण