अंगणवाडी केवळ आहार वाटपाचे केंद्र नव्हे, बालकांच्या सर्वांगीण विकासाचा आधारस्तंभ व्हावा – मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे

अंगणवाडी केवळ आहार वाटपाचे केंद्र नव्हे, बालकांच्या सर्वांगीण विकासाचा आधारस्तंभ व्हावा – मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे

‘आमची अंगणवाडी–आमची जबाबदारी’ संकल्पनेतून लोकसहभाग वाढविण्यावर भर

‘मिशन संपूर्ण’मधून जिल्ह्यातील सर्व गर्भवती व स्तनदा मातांना अंगणवाडी केंद्रातून एक वेळचे संपूर्ण जेवण

*नवव्या राष्ट्रीय पोषण माह–२०२६ निमित्त जिल्हास्तरीय उद्घाटन व एकदिवसीय कार्यशाळा*

गडचिरोली, दि. १८ सप्टेंबर (जिमाका) : अंगणवाडी केंद्रे केवळ आहार वितरणापुरती मर्यादित न राहता बालकांच्या पोषणासह त्यांच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासाची केंद्रे म्हणून विकसित झाली पाहिजेत. त्यासाठी शासनाच्या प्रयत्नांसोबत पालक आणि स्थानिक समुदायानेही अंगणवाडी केंद्राची जबाबदारी स्वीकारून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.

‘मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०’ अंतर्गत नवव्या राष्ट्रीय पोषण माह–२०२६ निमित्त महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय उद्घाटन व एकदिवसीय कार्यशाळेत ते मार्गदर्शन करीत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास दीपक बानाइत तसेच सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका तसेच पालक उपस्थित होते.

अंगणवाडी सक्षमीकरणासाठी प्रभावी नियोजनाच्या सूचना

अंगणवाडी केंद्रांचा उपयोग बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रभावीपणे व्हावा, यासाठी महिला व बाल विकास विभागाने भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना सुहास गाडे यांनी दिल्या. बालकांचे पोषण, पूर्वप्राथमिक शिक्षण, बाल्यकालीन उद्दीपन आणि माता-बाल आरोग्य यांचा एकत्रित विचार करून अंगणवाडी केंद्रे अधिक सक्षम करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

अंगणवाडी केंद्र हे गावातील माता आणि बालकांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे ते केवळ खाऊ किंवा आहार वाटपाचे केंद्र अशी त्याची ओळख न राहता बालकाच्या विकासाचा मजबूत आधारस्तंभ म्हणून विकसित करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मिशन संपूर्ण’मधून गर्भवती व स्तनदा मातांना संपूर्ण जेवण

गडचिरोली जिल्ह्यात WCL-CSR च्या माध्यमातून ‘मिशन संपूर्ण’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व गर्भवती व स्तनदा मातांना अंगणवाडी केंद्रातून दिवसातून एक वेळ संपूर्ण जेवण देण्यात येत आहे.

गर्भवती व स्तनदा मातांच्या पोषणामध्ये सुधारणा करून माता व बालकांचे आरोग्य अधिक सुदृढ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच प्रत्येक पात्र मातेपर्यंत त्याचा लाभ पोहोचेल, यासाठी अंगणवाडी स्तरावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

‘आमची अंगणवाडी–आमची जबाबदारी’

यावर्षीच्या राष्ट्रीय पोषण माहची मध्यवर्ती संकल्पना ‘आमची अंगणवाडी–आमची जबाबदारी’ अशी निश्चित करण्यात आली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजामध्ये स्थानिक समुदायाची मालकीची भावना आणि जबाबदारी वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

ग्रामपंचायत, महिला बचत गट, माता समिती, पालक, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी अंगणवाडी केंद्राची स्वच्छता व सुरक्षितता, परिसर सुशोभीकरण, बालकांची नियमित उपस्थिती, पोषण आहाराची गुणवत्ता आणि बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

राष्ट्रीय पोषण माह–२०२६ अंतर्गत ९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रात विविध जनजागृतीपर आणि लोकसहभागात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत.

पाच प्रमुख विषयांवर विशेष भर

यंदाच्या पोषण माहमध्ये आहारातील विविधता व पुरेसे प्रथिने, अंगणवाडी केंद्रात शिजविलेला गरम व ताजा आहार, स्थानिक समुदायाची मालकी व जबाबदारी, बालकांच्या विकासासाठी पोषण व बाल्यकालीन उद्दीपन आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या पाच प्रमुख विषयांवर विशेष भर देण्यात आला आहे.

बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या आहारात स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली धान्ये, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळे, दूध व दुग्धजन्य पदार्थ, अंडी तसेच इतर प्रथिनयुक्त पदार्थांचा योग्य समावेश करण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना दिल्या जाणाऱ्या गरम व ताज्या शिजविलेल्या आहाराची गुणवत्ता, पौष्टिकता, स्वच्छता आणि सुरक्षितता याकडेही विशेष लक्ष देण्याचे सांगण्यात आले.

स्थानिक साहित्यातून खेळणी; THR पासून पौष्टिक पदार्थांचे प्रात्यक्षिक

कार्यशाळेत बालकांच्या विकासासाठी विविध खेळांचे महत्त्व सांगतानाच स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्याचा वापर करून खेळणी व शैक्षणिक साधने कशी तयार करता येतील, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

बालकांच्या पहिल्या सहा वर्षांतील काळ त्यांच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने अंगणवाडी केंद्रांमध्ये वयोगटानुसार खेळ, गोष्टी, गाणी, संवाद आणि विविध बाल्यकालीन उद्दीपन उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला. पालकांनीही मुलांशी नियमित संवाद साधणे, त्यांच्यासोबत खेळणे आणि घरामध्ये शिकण्यास पोषक वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व सांगण्यात आले.

यासोबतच अंगणवाडी केंद्रांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या घरपोच पूरक पोषण आहारापासून (Take Home Ration–THR) घरच्या घरी आरोग्यदायी, पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ कसे तयार करता येतील, याचे प्रात्यक्षिक व प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

बालकाच्या आयुष्यातील पहिले १००० दिवस महत्त्वाचे

कार्यशाळेत गर्भधारणेपासून बालकाच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंतचे पहिले १००० दिवस माता व बालकाच्या आरोग्य आणि बालकाच्या भावी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. या काळात योग्य पोषण, आवश्यक आरोग्यसेवा, स्वच्छता आणि बालकाची योग्य काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच गर्भवती महिला व स्तनदा मातांसाठी असलेल्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची (PMMVY) माहिती प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविणे, आवश्यक प्रक्रिया व कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करणे आणि पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राष्ट्रीय पोषण माहमधील उपक्रम केवळ या कालावधीपुरते मर्यादित न ठेवता पोषणविषयक चांगल्या सवयी, पालकांचा सहभाग आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सकारात्मक बदल सातत्याने रुजविण्याची गरज मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी अधोरेखित केली.

‘सक्षम बालक–सुदृढ माता–पोषणयुक्त कुटुंब–सक्षम अंगणवाडी’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिला व बाल विकास विभागासह पालक आणि स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यशाळेस सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, पालक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.

००००,
थोडे नवीन जरा जुने