सायबर गुन्ह्यांपासून विद्यार्थ्यांनी सावध राहावे,पारबताबाई विद्यालयात सायबर सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम

सायबर गुन्ह्यांपासून विद्यार्थ्यांनी सावध राहावे,पारबताबाई विद्यालयात सायबर सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम

कोरची : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट, स्मार्टफोन व सोशल मीडियाचा वापर वाढला असून त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा सुरक्षित वापर करावा, अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर करू नये आणि सायबर गुन्ह्यांपासून सदैव सावध राहावे, असे आवाहन कोरचीचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी केले.

पारबताबाई विद्यालय, कोरची व पोलीस स्टेशन, कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सोनल बल्लाळ मॅडम व पोलीस हवालदार नाजिया शेख यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, महिला अत्याचार प्रतिबंध, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच शालेय सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

गुगल, ई-मेल, व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करताना विद्यार्थ्यांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. संशयास्पद लिंकवर क्लिक करणे, अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधणे, पासवर्ड अथवा ओटीपी शेअर करणे यामुळे सायबर फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने व सुरक्षितपणे वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमात गुड टच-बॅड टच, महिला सुरक्षा, सायबर कायदे व नियम आणि शालेय सुरक्षा याविषयीही विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षक गुरनुले यांनी केले, तर आभार शिक्षक चौधरी यांनी मानले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने