अहेरीत विना मीटर रिडिंग अवाढव्य वीजबिले पाठवल्याचा आरोप; सामाजिक कार्यकर्ते आयुष मामीडवार यांचा महावितरणला निवेदन

अहेरीत विना मीटर रिडिंग अवाढव्य वीजबिले पाठवल्याचा आरोप; सामाजिक कार्यकर्ते आयुष मामीडवार यांचा महावितरणला निवेदन

राकेश तेलकुंटलवार/ उपसंपादक 
महाराष्ट्र प्रहार न्यूज 

अहेरी, दि. १६ जुलै : अहेरी शहर तसेच ग्रामीण भागातील अनेक वीज ग्राहकांना प्रत्यक्ष मीटर रिडिंग न घेता अंदाजे व अवाढव्य रकमेची वीजबिले पाठविली जात असल्याचा आरोप करत नागरिकांच्या वतीने आयुष सुनील मामीडवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) कार्यालय, आलापल्ली येथे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक ग्राहकांचे मीटर उपलब्ध असूनही प्रत्यक्ष रिडिंग न घेता बिले तयार केली जात असल्याने मीटरवरील रिडिंग आणि बिलातील युनिटमध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असून वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी सर्व ग्राहकांच्या मीटरचे दरमहा प्रत्यक्ष रिडिंग घेऊनच वीजबिले तयार करावीत, चुकीची व अवाढव्य बिले तातडीने तपासून दुरुस्त करावीत तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन भविष्यात अशा प्रकारची त्रुटी होणार नाही यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन योग्य कार्यवाही न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर 'तालाठोको आंदोलन' करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी अरुण धूर्वे, बिरजू गेडाम, मल्लया कंकबंडावार आणि मडपेलीवार हे उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी गडचिरोली, अधीक्षक अभियंता (महावितरण) गडचिरोली, उपविभागीय अभियंता (महावितरण) अहेरी तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच (CGRF) यांना देण्यात आले.
थोडे नवीन जरा जुने