डॉ. किशोर नैताम यांची ५० वी जयंती उत्साहात साजरी

डॉ. किशोर नैताम यांची ५० वी जयंती उत्साहात साजरी

विद्यार्थ्यांसाठी मॉक पार्लमेंट व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन; डॉ. किशोर नैताम फाऊंडेशनच्या संकेतस्थळाचे लोकार्पण

आलापल्ली, दि. १७ सप्टेंबर २०२६ : सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक जागृती आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक प्रश्नांविषयी विचार करण्याची क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉ. किशोर नैताम फाऊंडेशनतर्फे डॉ. किशोर नैताम यांच्या ५० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आलापल्ली येथे उत्साहात करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा व मॉक पार्लमेंट घेण्यात आली. तसेच फाऊंडेशनच्या drkishornaitamfoundation.in या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गजानन लोनबोले , मुख्याध्यापक, राणी दुर्गावती विद्यालय, आलापल्ली होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. रामटेके, सहाय्यक वनसंरक्षक, भामरागड विभाग यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. इंदुमती खंडारे, सौ. सुषमा भोयर, प्रा. विष्णू सोनोने, प्रा. नीरज खोब्रागडे, सौ. जमुनाबाई नैताम तसेच श्री. रावजी नैताम, अध्यक्ष, डॉ. किशोर नैताम फाऊंडेशन उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात धर्मनिरपेक्ष प्रार्थना व राणी दुर्गावती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत नृत्याने झाली. फाऊंडेशनची स्थापना, त्याची उद्दिष्टे, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम आणि भविष्यातील कार्याची रूपरेषा याबाबत डॉ. सुमती किशोर नैताम, सचिव, डॉ. किशोर नैताम फाऊंडेशन यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली.
संकेतस्थळाचे लोकार्पण
डॉ. किशोर नैताम यांच्या वडिल श्री. रावजी नैताम, आई सौ. जमुनाबाई नैताम आणि मातोश्री डॉ. इंदुमती खंडारे यांच्या शुभहस्ते drkishornaitamfoundation.in या फाऊंडेशनच्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. फाऊंडेशनच्या सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांची माहिती व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी संकेतस्थळ महत्त्वाची भूमिका बजावेल, असे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री. गजानन लोनबले यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याची आणि आपल्या विचारांना प्रभावीपणे मांडण्याची गरज व्यक्त केली. प्रा. नीरज खोब्रागडे व प्रा. सोनोने सर यांनी विद्यार्थ्यांना तसेच पालकांना आजच्या काळातील शैक्षणिक तसेच सामाजिक समस्यांबद्दल जागृत केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ किशोर नैताम यांच्या मित्र परिवांरांनी गीत गायन तसेच शब्द सुमनांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 
२२ विद्यार्थ्यांचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग
दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण २२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी पुढील विषय देण्यात आले होते :
1. राजकारणात युवकांची भूमिका
2. पर्यावरण आणि माझी भूमिका 
3. सोशल मीडिया : उपयुक्तता आणि दुष्परिणाम
4. दुर्गम भागातील आरोग्यविषयक मानसिकता
स्पर्धेत प्रथम क्रमांक – खेमा भीमराव जूनघरे (₹३,०००), द्वितीय क्रमांक – नैतिक बंडू चार्लावार (₹२,०००) आणि तृतीय क्रमांक – माहेक शेख (₹१,०००) यांनी मिळविला.
मॉक पार्लमेंटमध्ये ७२ स्पर्धकांचा सहभाग
तिसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांच्या सहभागातून मॉक पार्लमेंट घेण्यात आली. या उपक्रमात तब्बल ७२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये सामाजिक व सार्वजनिक जीवनाशी संबंधित विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडत चर्चेत सहभाग घेतला. अग्रिम जाहीर करण्यात आलेल्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सविस्तर चर्चा व विचारमंथन केले.
मॉक पार्लमेंटच्या अध्यक्षपदाची भूमिका सहभागी श्रीमती हाजरा शेख यांनी पार पाडली. स्पर्धेतील विजेत्यांसाठी अनुक्रमे ₹५,०००, ₹३,००० आणि ₹२,००० अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती.
🥇 प्रथम क्रमांक – नजमीन आरिफ खान — ₹५,०००
🥈 द्वितीय क्रमांक – कैलास शिंगणे — ₹३,०००
तृतीय क्रमांक : शोन किशोर नैताम – ₹२,०००
मॉक पार्लमेंट व वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला पुस्तक भेट देण्यात आले, त्यामुळे स्पर्धेबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा संदेशही देण्यात आला.
उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सत्कार
कार्यक्रमात आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय व असामान्य कार्य केल्याबद्दल डॉ. गणेश लाडासकर, सौ. शैला गोरेकर आणि  शैक्षणिक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल कु. नमिता मडावी यांचा शाल , पुस्तक व सन्मान चिन्ह देऊन  विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याची परंपरा पुढे नेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे विविध सत्रांचे सूत्रसंचालन श्री. विनोद खांडेकर (उद्घाटन व संकेतस्थळ लोकार्पण), मेघा श्री मडावी (वक्तृत्व स्पर्धा), अॅड. उदय गालबले (मॉक पार्लमेंट) तसेच बक्षिश समारंभाचे संचलन श्री भीमराव जूनाघरे यांनी केले. 
वक्तृत्व स्पर्धेचे मूल्यांकन 
सौ सुषमा भोयर , श्री आनंद अलोने व श्री अमोल दुर्योधन यांनी केले तसेच मॉक पार्लियामेंट चे मूल्यांकन श्री सुधीर सुरपाम, श्री गणेश लाडस्कर व श्री भीमराव जुनघरे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन डॉ. सुमती किशोर नैताम, सचिव, डॉ. किशोर नैताम फाऊंडेशन यांनी केले.
चौथ्या व अंतिम सत्रात पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप केक कापून आणि सामूहिक भोजनाने करण्यात आला. 
सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक जागृती, विद्यार्थ्यांना व्यासपीठ आणि समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव या माध्यमातून डॉ. किशोर नैताम फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
थोडे नवीन जरा जुने