हक्कांसाठी नर्सेसनी संघटित व्हावे,मायाताई शिरसाट यांचे आवाहन; गडचिरोली जिल्हा नर्सेस संघटनेच्या आमसभेत सेवानिवृत्त परिचारिकांचा सत्कार
गडचिरोली : दुर्गम आणि आदिवासीबहुल भागात प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र आरोग्य सेवा बजावणाऱ्या परिचारिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी संघटितपणे लढा देणे आवश्यक आहे. हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी नर्सेसनी संघटनेच्या माध्यमातून एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्ष तथा मार्गदर्शक मायाताई शिरसाट यांनी केले.
गडचिरोली येथील पंचायत समिती सभागृहात नर्सेस संघटना, जिल्हा गडचिरोलीच्या आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नर्सेस संघटनेच्या कार्याध्यक्ष कविताताई बोदरे होत्या. माजी ग्रामविकास अधिकारी रतन शेंडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
मायाताई शिरसाट म्हणाल्या, गडचिरोली जिल्ह्यातील नर्सेस दुर्गम भागातील खेड्यापाड्यांत कार्यरत राहून नागरिकांना आरोग्य सेवा देतात. अनेकदा घरोघरी जाऊन रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी त्या पार पाडतात. आरोग्य विभागाशी थेट संबंधित नसलेली विविध कामेही परिचारिकांवर सोपविली जातात. मात्र, त्यांच्या पगारवाढीबरोबरच नियमित भत्ते, मानधन आणि इतर प्रश्नांकडे शासनाचे अपेक्षित लक्ष नाही. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी संघटितपणे आवाज उठविणे आणि सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
‘परिचारिका वाघीण, तर संघटना वाघांची’
माजी ग्रामविकास अधिकारी रतन शेंडे यांनी परिचारिकांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, खेड्यापाड्यांत प्रतिकूल परिस्थितीत सेवा देणारी परिचारिका ही वाघीण आहे आणि त्यांची संघटना ही वाघांची संघटना आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवून आपल्या हक्कांसाठी लढण्याची ताकद नर्सेस संघटनेत आहे. संघटनेच्या माध्यमातून अन्यायाला प्रतिकार करण्याचे काम सातत्याने झाले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी राज्य कार्यकारिणीच्या सरचिटणीस रंजनाताई कोहपरे, ग्रामविकास अधिकारी कविश्वर बनपुरकर, ग्रामसेवक संघटनेचे सचिव खुशाल नेवारे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. मुनिश्वर बोरकर, चक्रधर मेश्राम, अमृता नागदेवते, सुलोचना शिरभाते आदी मान्यवर उपस्थित होते. कविताताई बोदरे, कविश्वर बनपुरकर, प्रा. मुनिश्वर बोरकर, चक्रधर मेश्राम यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त परिचारिकांचा सत्कार करण्यात आला. परिचारिकांच्या विविध प्रश्नांवर तसेच संघटनात्मक बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील नर्सेस मोठ्या संख्येने आमसभेला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन संघटनेच्या सचिव शर्मिला जनबंधु यांनी केले, तर मंगला चंदनखेडे यांनी आभार मानले.
Tags:
आरोग्य विभाग