सम्राट अशोकाच्या ८४ हजार स्तूपांपैकी एक स्तूप उदापुरात असण्याची शक्यता; भदन्त सुमानंद यांचे प्रतिपादन


सम्राट अशोकाच्या ८४ हजार स्तूपांपैकी एक स्तूप उदापुरात असण्याची शक्यता; भदन्त सुमानंद यांचे प्रतिपादन

बातमीदार : प्रा. मुनिश्वर बोरकर 

ब्रम्हपुरी : सम्राट अशोकाने देशभरात उभारलेल्या ८४ हजार स्तूपांपैकी एक स्तूप चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापुर येथे असण्याची शक्यता आहे. उदापुरातील या भव्य स्तूपस्थळाचे शासनाने पुरातत्त्वीय संशोधन करून शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन करावे, अशी मागणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल संघटना, नवी दिल्लीचे भदन्त सुमानंद यांनी केली.

उदापुर येथे २६ सप्टेंबर रोजी बौद्ध पौर्णिमेनिमित्त वंदन व परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सम्राट अशोककालीन स्तूपाचे अवशेष आढळल्याच्या पार्श्वभूमीवर स्तूपस्थळी बुद्धवंदना व परिक्रमा करण्यात आली. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भदन्त सुमानंद यांनी उदापुरच्या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे आयोजन सत्यकी खोजकार, सत्यशोधक नागपित्र धर्मेश पाटील, नागपूर यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदन्त सुमानंद, धम्मबंधू प्रा. मुनिश्वर बोरकर, डॉ. गोपाल रायपुरे आणि डॉ. प्रेमलाल मेश्राम उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे (आरमोरी), सुशीला भगत (आलापल्ली), दशरथ साखरे, चक्रधर मेश्राम, समता सैनिक दलाचे अभिमन्यू बन्सोड, किशोर पिल्लावान, उदापुर येथील संघमित्रा राजवाडे आदी उपस्थित होते.

यावेळी स्तूपस्थळी बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी गावातून धम्मरॅली काढली. आयोजक धर्मेश पाटील यांनी उदापुरातील स्तूपाबाबत सविस्तर माहिती देत या ऐतिहासिक स्थळाच्या संवर्धन व संशोधनाची गरज व्यक्त केली.

प्रा. मुनिश्वर बोरकर, डॉ. प्रेमलाल मेश्राम, डॉ. गोपाल रायपुरे, प्रज्ञा निमगडे, किशोर पिल्लावान आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील समता सैनिक दलाचे कार्यकर्ते तसेच धम्मबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने