(ए आय फोटो)
गावात भीतीचे वातावरण; उपसरपंच शौरभ पाल यांची तत्परता, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल
गडचिरोली/चामोर्शी, दि. २० सप्टेंबर २०२६ : चामोर्शी तालुक्यातील मुरखळा चक येथे पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कुत्र्याने अचानक नागरिकांवर हल्ला करत तब्बल सात जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हल्ल्यात विलास रामदास रोहनकर (वय ५२), धनराज रोहनकर (वय ७८), पत्रुजी किसन घोडे (वय ६५), मयूर गिरीधर शेंद्रे (वय २४), ध्रुव तुकाराम ठेमसकर (वय ५४), शामराव बालाजी कुणघाटकर (वय ५५) आणि शिलाबाई डोमु गोवर्धन (वय ४०) हे सात जण जखमी झाले. सर्व जखमी मुरखळा चक येथील रहिवासी आहेत.
पहाटेच्या शांततेत अचानक हल्ला; नागरिकांमध्ये घबराट
रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मुरखळा चक येथे पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक नागरिकांवर हल्ला केला. काही वेळातच सात जणांना कुत्र्याने चावा घेतल्याने गावात घबराट निर्माण झाली. घटनेनंतर नागरिकांनी सावध होत कुत्र्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला.
उपसरपंच शौरभ पाल धावले मदतीला
घटनेची माहिती मिळताच मुरखळा चकचे उपसरपंच शौरभ पाल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रसंगावधान राखत त्यांनी सातही जखमींना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत झाली.
प्राथमिक उपचारानंतर सातही जखमी गडचिरोलीला
चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. मयंक करमणकर यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. जखमींना अँटी-रेबीज व्हॅक्सिन देण्यात आले.
मात्र, ग्रामीण रुग्णालयात आवश्यक असलेले रेबीज इम्युनोग्लोब्युलिन (सिरम) उपलब्ध नसल्याने सातही जखमींना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले. आवश्यक सिरम उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना गडचिरोली येथे हलवावे लागत असल्याची माहिती डॉ. मयंक करमणकर यांनी दिली.
‘सिरम’ उपलब्ध नसल्याने आरोग्य सुविधांवर प्रश्नचिन्ह
चामोर्शी ग्रामीण रुग्णालयावर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत कुत्रा चावल्यासारख्या आपत्कालीन प्रसंगी आवश्यक असलेले रेबीज इम्युनोग्लोब्युलिन उपलब्ध नसणे, हा मुद्दा या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.
कुत्रा चावल्यानंतर वेळेत योग्य वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने, ग्रामीण रुग्णालयात अँटी-रेबीज व्हॅक्सिनसोबत आवश्यक सिरमचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करा
एकाच पहाटे सात नागरिकांना चावा घेणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे मुरखळा चक परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना करून पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Tags:
ग्रामपंचायत प्रशासन