वैनगंगा नदीत मद्यधुंद तरुणाची उडी; तब्बल नऊ तास खडकावर अडकला

वैनगंगा नदीत मद्यधुंद तरुणाची उडी; तब्बल नऊ तास खडकावर अडकला

बचावासाठी गेलेले दोन युवकही पाण्यात अडकले; एसडीआरएफ जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी तिघेही सुखरूप बाहेर


आष्टी (प्रतिनिधी) : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील वैनगंगा नदीत पहाटेच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणाने जुन्या पुलावरून नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली. नदीच्या वेगवान प्रवाहात वाहत जात असताना हा तरुण मध्यभागी असलेल्या खडकाजवळ अडकून पडला. तब्बल नऊ तास तो नदीच्या पाण्यात अडकून होता. त्याला वाचविण्यासाठी गेलेले दोन युवकही नदीपात्रात अडकून पडल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. अखेर आष्टी पोलिसांनी गडचिरोली येथील एसडीआरएफ पथकाला पाचारण केले. जवानांनी सुमारे तासभर अथक प्रयत्न करून तिन्ही तरुणांना सुखरूप बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणाने आष्टी येथील वैनगंगा नदीवरील जुन्या पुलावरून नदीत उडी मारली. त्यावेळी नदीकाठावर असलेल्या काही मच्छीमारांनी त्याला नदीत उडी मारताना पाहिले. नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो वाहून गेला; मात्र नदीच्या मध्यभागी असलेल्या एका खडकाजवळ तो अडकून पडला.

दरम्यान, पाण्यात अडकलेल्या तरुणाला वाचविण्यासाठी दुपारच्या सुमारास दोन युवकांनी धाडस करत नदीपात्रात उडी घेतली. मात्र नदीतील पाण्याचा प्रवाह आणि वाढलेली पाण्याची पातळी यामुळे ते दोघेही अडकून पडले. त्यामुळे एका तरुणाला वाचविण्यासाठी गेलेले दोघेही संकटात सापडल्याने घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी प्रसंगावधान राखत तातडीने गडचिरोली येथील एसडीआरएफ पथकाला पाचारण केले. दुपारी सुमारे २ वाजता एसडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. नदीतील पाण्याचा वेग आणि परिस्थितीचा अंदाज घेत जवानांनी बचावकार्य सुरू केले.

सुमारे तासभर अथक प्रयत्न केल्यानंतर एसडीआरएफ जवानांनी नदीच्या मध्यभागी अडकलेल्या तिन्ही युवकांपर्यंत पोहोचत त्यांना सुरक्षितपणे नदीबाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून तिन्ही युवकांचे प्राण वाचले.

एसडीआरएफ जवानांचे कौशल्य, पोलिसांचे प्रसंगावधान आणि बचावकार्यामुळे तिन्ही युवकांना जीवदान मिळाले.
थोडे नवीन जरा जुने