लसीकरणानंतर बालकाच्या मृत्यूप्रकरणी जिल्हास्तरीय समितीकडून चौकशी
शवविच्छेदन व AEFI समितीच्या अंतिम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण होणार स्पष्ट
गडचिरोली, दि. ९ सप्टेंबर (जिमाका) : अहेरी तालुक्यातील कवराम येथील दोन महिन्यांच्या बालकाचा नियमित लसीकरणानंतर प्रकृती खालावून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना लसीकरणानंतर उद्भवलेली प्रतिकूल घटना (AEFI - Adverse Event Following Immunization) म्हणून नोंदविण्यात आली असून, बालकाच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची जिल्हास्तरीय AEFI चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिली.
प्राथमिक माहितीनुसार, कवराम येथील श्रीमती सुनिता शामराव तलांडी यांच्या दोन महिन्यांच्या बालकाला प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत आयोजित नियमित लसीकरण सत्रात लसीचे डोस देण्यात आले होते. त्यानंतर बालकाची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची जिल्हा आरोग्य प्रशासनाने दखल घेतली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हास्तरीय AEFI समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात येत आहे. समितीकडून घटनास्थळाला भेट देऊन लसींची साठवणूक व शीतसाखळी (Cold Chain) व्यवस्था, वापरण्यात आलेल्या लसींची बॅच, लसीकरणाची प्रक्रिया तसेच बालकाची वैद्यकीय पार्श्वभूमी यांची तपासणी केली जात आहे.
लसीकरण आणि बालकाचा मृत्यू यांच्यातील कारणात्मक संबंधाबाबत सध्या कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. बालकाच्या शवविच्छेदनाचा अहवाल तसेच जिल्हास्तरीय AEFI समितीची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे.
या घटनेबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. चौकशी समितीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी केले आहे.
००००
Tags:
आरोग्य विभाग