कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची चिंतन व सहविचार सभा उत्साहात संपन्न
संघटन बळकटीकरणासह कर्मचारी व शिक्षकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार
तालुका प्रतिनिधी चामोर्शी:-
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, जिल्हा गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीची चिंतन, सहविचार व संघटनात्मक आढावा सभा शनिवारी गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृह, इंदिरा गांधी चौक येथे उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संघटनेचे कार्य अधिक सक्षम व व्यापक करण्याबरोबरच कर्मचारी आणि शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर संघटितपणे व प्रभावीपणे काम करण्याबाबत या सभेत सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष गणेश मडावी व सरचिटणीस प्रभाकर सोनडवले यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश साखरे होते.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप मेश्राम, महासचिव गोविंद शिरपूरकर, कोषाध्यक्ष मोरेश्वर भैसारे, कार्यालयीन सचिव सोहन माहोरकर, उपाध्यक्ष कपिल सहारे, देवराव जुलमे, अनुप मंडल, उपकोषाध्यक्ष सुधा खोब्रागडे, संघटक सुनील कांबळे, आनंद साखरे, संघटिका आशा कुमरे, महिला विभाग प्रमुख सविता उराडे, युवा आघाडी प्रमुख निखिल उईके, सल्लागार दत्तराज नरड, प्रभाकर साखरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेदरम्यान संघटनेच्या विद्यमान कार्याचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचविणे, नवीन सभासदांची नोंदणी वाढविणे, संघटनेची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यंत्रणा अधिक मजबूत करणे तसेच विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढविणे यावर विशेष चर्चा करण्यात आली.
तसेच कर्मचारी व शिक्षकांच्या विविध सेवाविषयक, प्रशासकीय व अन्य प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविणे, संबंधित प्रश्नांचा पाठपुरावा करणे आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावी भूमिका बजावणे, याबाबतही उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले. आगामी काळातील संघटनात्मक उपक्रम, विविध कार्यक्रम आणि संघटनेच्या विस्ताराबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चक्रपाणी कन्नाके तसेच जिल्हा कार्याध्यक्ष चंदू रामटेके यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून, सकारात्मक दृष्टिकोनातून आणि एकजुटीने कार्य करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे संघटन अधिक व्यापक आणि सक्षम करण्यासाठी आगामी काळात तालुकानिहाय संघटनात्मक कामकाजाला गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कर्मचारी व शिक्षकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्याचेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सभा शिस्तबद्ध, सकारात्मक व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेचे सूत्रसंचालन जिल्हा कोषाध्यक्ष मोरेश्वर भैसारे यांनी केले, तर अरुण शिडाम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Tags:
शिक्षण विभाग