पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने एअरलिफ्ट

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने एअरलिफ्ट

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तातडीची मदतकार्य मोहीम

गडचिरोली, दि. २७ सप्टेंबर (जिमाका) : भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार ही तातडीची मदतकार्य मोहीम राबविण्यात आली.

काल बिनागुंडा येथून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेल्या संगीता चुक्कू उसेंडी या सात वर्षीय मुलीला आज लाहेरी येथून हेडरी येथील रुग्णालयात पोहोचविण्यात आले. तसेच अपेक्षा ऋषी आलाम आणि रोशन चिना मडावी या दोन रुग्णांनाही पुढील उपचारांसाठी हेडरी येथे हलविण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, या रुग्णांमध्ये सिकलसेलचा त्रास असलेल्या रुग्णाचाही समावेश आहे.

वैद्यकीय कामासाठी या भागात उपलब्ध असलेल्या लॉइड्स मेटल्स कंपनीच्या हेलिकॉप्टरचा आपत्कालीन स्थितीत तत्परतेने वापर करण्यात आला. आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत आणि भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांनी रुग्णांना हलविण्यासाठी आवश्यक उपाययोजना व समन्वय केला. रुग्णांसोबत निर्मला आलाम आणि चिना कुड्यामी हेही होते. प्रशासनाच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे तीनही रुग्णांना वेळेत पुढील वैद्यकीय उपचारांसाठी पोहोचविण्यात यश आले.
थोडे नवीन जरा जुने