विद्यार्थ्यांनीच चालविले आश्रमशाळेचे प्रशासन!
कोरची आश्रमशाळेत ‘स्वयंशासन’ उपक्रमातून शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने साजरा
जितेंद्र सहारे
कोरची : तालुका प्रतिनिधी
भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी देशभर शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत मा.अरुणकुमार एम यांच्या मार्गदर्शन खाली शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कोरची येथे शिक्षक दिनाला विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाचा अनोखा धडा देत ‘स्वयंशासन’ उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका, नर्स, ग्रंथपाल आणि शिपाई अशा विविध जबाबदाऱ्या एका दिवसासाठी स्वीकारल्या. विद्यार्थ्यांनी केवळ पदांची नक्कल न करता शालेय प्रशासन, वर्ग अध्यापन, शिस्त, आरोग्य व्यवस्था आणि दैनंदिन कामकाजाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत ‘शाळा चालविणे म्हणजे नेमके काय?’ याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
विशेष आकर्षण ठरले ते पहिलीच्या चिमुकल्यांचे! त्यांनी आपल्या शिक्षकांची हुबेहूब नक्कल करत वर्गात विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निरागस शैलीने उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, तर मोठ्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वगुणांची झलक दाखवून दिली.
या स्वयंशासन उपक्रमात मुख्याध्यापक म्हणून निकिता कांटेगे, उपमुख्याध्यापक लक्ष्मी कुवर, अधीक्षिका पिंकी मुलेटी, अधीक्षक शिवदास ऊईके, ग्रंथपाल दीक्षा कोरेटी, शिपाई नितीन मिरी तसेच शिक्षक म्हणून सानिया कराडे, सुगंधा बोगा, शिवानी होळी, वंदना बागडेरीया, शिरेस कुमरे, अनिता कोरचा आदी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
दिवसभराची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या विद्यार्थ्यांचा शेवटी पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वक्षमता, निर्णयक्षमता आणि संघभावना निर्माण होण्यास मदत झाली.
यानंतर बहुउद्देशीय सभागृहात मुख्याध्यापक उमाकांत ढोक यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दिनाचा कार्यक्रम झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी निकिता कांटेगे हिने एका दिवसासाठी मुख्याध्यापकाची जबाबदारी सांभाळताना आलेला अनुभव व्यक्त केला. ‘मुख्याध्यापक होणे म्हणजे केवळ खुर्चीवर बसणे नसून संपूर्ण शाळेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणे आहे,’ या अनुभवातून तिने प्रशासनातील आव्हानांची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली कोरेटी हिने केले, तर आभार प्रदर्शन ऋची नैताम हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या विद्यार्थी मंत्रिमंडळाने महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना केवळ शिक्षकांचा पोशाख देण्यात आला नाही, तर शिक्षक, प्रशासन आणि शालेय जबाबदारीचे वास्तव त्यांच्या हातात सोपविण्यात आले. त्यामुळे ‘स्वयंशासन’ हा उपक्रम आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आणि लोकशाही नेतृत्वाचा प्रभावी धडा ठरला.
Tags:
शिक्षण विभाग