आष्टी पोलिसांचा मध्यरात्री फिल्मी स्टाईल पाठलाग; देशी दारूसह ३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
आष्टी :
अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचा पाठलाग करून आष्टी पोलिसांनी मध्यरात्री धडाकेबाज कारवाई केली. कोनसरी ते बहादूरपूर मार्गावरील जंगल परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत देशी दारूसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आष्टी पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी कोनसरी ते बहादूरपूर मार्गावरून चारचाकी वाहनाने अवैध देशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने बहादूरपूर जंगल परिसरात सापळा रचला.
रात्रीच्या सुमारास संशयित चारचाकी वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी वाहनचालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र, वाहन न थांबविता पुढे जात असल्याने पोलिसांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला. काही अंतर पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी वाहन थांबवून त्यातील दोघांना ताब्यात घेतले.
वाहनाची झडती घेतली असता खाकी रंगाच्या बॉक्समध्ये देशी दारूच्या २ हजार निपा आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेल्या देशी दारूची किंमत १ लाख ६० हजार रुपये, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनाची किंमत १ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिस प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
अशाप्रकारे पोलिसांनी ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत रोहित रेमन भक्त (वय २१) आणि संदीप किरण हालदार (वय २१), दोघेही रा. श्रीनिवासपूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली, यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे., अहेरी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी हेमंत चांदेवार, अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टीचे पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलिस अंमलदार मोहन लांबाडे, वैभव हेडाऊ, गणेश तुमके आणि सुभाष वाकडे यांनी सहभाग घेतला.
Tags:
पोलिस विभाग