आष्टीत ७० वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट; आष्टी पोलिसांकडून तपास सुरू
आष्टी, प्रतिनिधी : आष्टी येथील एका ७० वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी २ ते २.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. बाबुराव गोंगले (वय ७०, रा. आष्टी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव गोंगले हे सकाळी आपल्या मुलाच्या दुकानात गेले होते. त्यांनी मुलाकडे बँकेतून पैसे काढून देण्यास सांगितले. मात्र, मुलाने त्यास नकार दिला. त्यानंतर एका व्यक्तीने बाबुराव यांना समजावून सांगत घरी जाऊन शांत राहण्याचा सल्ला दिला होता.
यानंतर बाबुराव यांनी स्वतः बँकेत जाऊन पैसे काढले. प्रकृती ठीक नसल्याचे सांगून ते रुग्णालयातही गेले होते. त्यानंतर दुकानातून दोरी घेऊन ते घरी परतले. त्यावेळी घरात पत्नी नसल्याचे पाहून त्यांनी घरातील फाट्याला गळफास घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
दरम्यान, पत्नी घरी परतल्यानंतर बाबुराव गोंगले हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी तत्काळ मुलगा अनिल गोंगले यांना माहिती दिली. अनिल यांनी आष्टी पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
बाबुराव गोंगले हे शांत स्वभावाचे व्यक्ती म्हणून परिचित होते. त्यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेमागील कारणाचा तपास सुरू असून, पोलिस तपासानंतरच आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार आहे.
पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलिस पुढील तपास करीत आहेत.