‘५ टक्के अबंध निधीच्या नियोजनाचा अधिकार ग्रामसभेलाच द्या’

‘५ टक्के अबंध निधीच्या नियोजनाचा अधिकार ग्रामसभेलाच द्या’

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अहेरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन; सुधारित शासन परिपत्रकाची प्रत गावागावात देण्याची मागणी

अहेरी : पेसा क्षेत्रातील गावांना मिळणाऱ्या ५ टक्के अबंध निधीच्या नियोजन व खर्चाबाबत ग्रामसभेचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस, गडचिरोलीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात अहेरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एम. एस. वाढई यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली. अहेरी तालुक्यातील पेसा गावांना दरवर्षी ५ टक्के अबंध निधी प्राप्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निधीच्या नियोजन व खर्चाबाबत ग्रामसभेच्या अधिकारांबाबत स्पष्टता असणे आवश्यक असल्याची भूमिका संघटनेने मांडली.

दरम्यान, काही गावांमध्ये निधीच्या नियोजन व खर्चासंदर्भातील नियमांमध्ये बदल झाल्याची माहिती नागरिकांना मिळत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने यासंदर्भात कोणतेही नवीन किंवा सुधारित परिपत्रक काढले असल्यास त्याची अधिकृत प्रत संबंधित गावांच्या ग्रामसभांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच ५ टक्के अबंध निधीच्या नियोजन व खर्च प्रक्रियेत ग्रामपंचायत अधिकारी, तालुका पेसा समन्वयक आणि ग्रामसभा कोष समिती यांची नेमकी भूमिका व अधिकार किती आहेत, याची लेखी माहिती ग्रामसभांना देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. निधीच्या वापराबाबत ग्रामसभेचे अधिकार नेमके कोणते आहेत, याबाबत गावकऱ्यांना स्पष्ट माहिती मिळावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा सचिव बालाजी गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष नागेश मडावी, पक्षाचे कार्यकर्ते रितेश गावडे आणि सलीम शेख उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने