एटापल्लीतील राज्य महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना आक्रमक

एटापल्लीतील राज्य महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना आक्रमक

रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी; प्रशासनाला लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा

एटापल्ली शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी डांबर पूर्णपणे उखडून गेल्याने नागरिक, विद्यार्थी, रुग्ण तसेच स्थानिक व बाहेरील प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना तालुका शाखा, एटापल्लीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले.

एटापल्ली शहरातील मुख्य राज्य महामार्गाचे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असतानाही प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम रखडण्याचे नेमके कारण काय, कामाची सद्यस्थिती काय आहे, कामाची मुदत किती आहे आणि काम कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला आहे.

यासोबतच हालेवारा–देवदा मार्गाचीही अत्यंत दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण मार्ग खड्डेमय झाला आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाचीही तातडीने दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

दरम्यान, एटापल्ली परिसरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची झीज वाढत असल्याने, रस्त्याच्या मजबुतीकरणासोबतच वाहतूक व्यवस्थापनाबाबतही आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शिवसेनेने प्रशासनाकडे राज्य महामार्गाची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविणे, प्रलंबित रस्त्याचे काम त्वरित सुरू करणे, कामाचा दर्जा राखणे तसेच कामासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करण्याची मागणी केली आहे.

“विकासाला आमचा विरोध नाही; मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड चालणार नाही. एटापल्लीतील रस्ते दर्जेदार आणि सुरक्षित झालेच पाहिजेत,” अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कार्यवाही न केल्यास शिवसेनेच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन संविधानिक व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी अक्षय पुंगाटी, नामदेव हिचामी, प्रशांत तलांडे, कैलास उसेंडी, बाळू आत्राम, नत्तू दुर्वा, दानु आत्राम, सुमित खन्ना आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने