गणिताच्या आवडीला मेहनतीची जोड; देव गोंगलेची प्रज्ञाशोध परीक्षेत भरारी
भगवंतराव आश्रमशाळेच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याचे उल्लेखनीय यश; शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन ठरले प्रेरणादायी
गडचिरोली : जिद्द, सातत्य आणि अभ्यासातील चिकाटीच्या जोरावर भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रमशाळा, राजाराम (खां) येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थी देव मधुकर गोंगले याने महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत (MTS) उल्लेखनीय यश संपादन केले. सामान्य शेतकरी कुटुंबातील देवने मिळविलेल्या या यशामुळे त्याच्या कुटुंबासह शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे.
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीतर्फे २५ एप्रिल २०२६ रोजी राणी दुर्गावती कन्या शाळेत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत देवने आत्मविश्वासाने सहभाग घेत घवघवीत यश मिळविले.
देवला लहानपणापासूनच गणित विषयाची विशेष आवड आहे. इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत असताना जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक रामदास उघाडे यांनी गणित विषयाचा भक्कम पाया घातला. त्यानंतर जी. के. मडावी सर यांच्या मार्गदर्शनामुळे गणित विषयातील त्याची गोडी आणखी वाढली. गणितात सातत्याने चांगली कामगिरी करत त्याने आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली.
अभ्यासाच्या या प्रवासात इंदाराम येथील इम्रानखान पठाण मामा तसेच फरीन इम्रानखान पठाण यांचेही सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. अभ्यासाबाबत वेळोवेळी प्रोत्साहन देत त्यांनी देवला पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली. जिल्हा परिषद केंद्र शाळेतील सर्व शिक्षकांचेही मोलाचे मार्गदर्शन त्याला मिळाले.
यानंतर भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता आठवीत प्रवेश घेतल्यानंतर देवने अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. गणित विषयाचे शिक्षक सुदर्शन वासाडे यांनी नियमित गृहपाठ, सराव आणि मार्गदर्शनातून त्याच्या अभ्यासाला दिशा दिली. शिक्षकांनी दिलेला गृहपाठ वेळेत पूर्ण करून देवने अभ्यासातील शिस्त जपली.
देवच्या यशामागे मुख्याध्यापक टी.सी. ओड्नलवार, शिक्षक सुदर्शन वासाडे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि आई-वडिलांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. त्याच्या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी अभिनंदन केले असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“गणिताची आवड, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित अभ्यास यामुळे हे यश मिळाले. भविष्यातही सातत्याने अभ्यास करून मोठे यश मिळविण्याचा प्रयत्न करणार,” असा विश्वास देवने व्यक्त केला.
Tags:
शिक्षण विभाग