मरपल्लीच्या जंगलात वाघाची दहशत; प्रज्वल नागुलवार आक्रमक!

मरपल्लीच्या जंगलात वाघाची दहशत; प्रज्वल नागुलवार आक्रमक!

‘वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन’

युवकाने जीव वाचवण्यासाठी झाडावर काढली अख्खी रात्र; वनविभागाच्या कार्यक्षमतेवर नागुलवारांचा सवाल

एटापल्ली | राकेश तेलकुंटलवार / उपसंपादक

एटापल्ली :- मरपल्ली, वासामुंडी, बारसेवाडा, मचली आणि कोकोबंडा परिसरातील जंगलात वाघाचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दि. १२ सप्टेंबर रोजी महेंद्र भाऊजी दुर्वा (वय २३, रा. मरपल्ली) हे गाय-बैल राखण्यासाठी जंगलात गेले असताना अचानक त्यांच्या समोर वाघ आल्याने एकच खळबळ उडाली.

वाघ समोर येताच प्रसंगावधान राखून महेंद्र यांनी झाडावर चढून आपला जीव वाचवला. वाघाच्या भीतीने त्यांनी अख्खी रात्र झाडावरच काढली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही महेंद्र यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांसह ग्रामस्थांची चिंता वाढली.

रविवार दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळपासून ग्रामस्थांनी मोठी शोधमोहीम राबवली. अखेर सकाळी सुमारे ९ वाजता महेंद्र यांना सुखरूप शोधून काढण्यात आले.

‘नागरिकांचा जीव गेल्यावर वनविभाग जागा होणार का?’

या घटनेनंतर तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागुलवार यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जंगल परिसरात वाघाचा वावर असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू राहणार नाही. वनविभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत, तर ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा थेट इशारा प्रज्वल नागुलवार यांनी दिला.

मरपल्लीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये वाघाच्या दहशतीमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, वनविभागाने तातडीने वाघाचा शोध घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवावी, अशी मागणी नागुलवार आणि ग्रामस्थांनी केली आहे.


थोडे नवीन जरा जुने