मरपल्लीतील मोडकळीस आलेल्या पुलाचे तातडीने बांधकाम करा
दोन वर्षांपासून निवेदने देऊनही प्रश्न प्रलंबित; १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
राकेश तेलकुंटलवार उपसंपादक
महाराष्ट्र प्रहार न्यूज
एटापल्ली : प्रतिनिधी
एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली येथील मोडकळीस आलेल्या पुलाचे तातडीने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी तालुका काँग्रेस नेते तथा शाखा व्यवस्थापन समिती गूरुपल्लीचे अध्यक्ष श्री. प्रज्वल नागुलवार, नगरपंचायत एटापल्लीचे उपाध्यक्ष मीनाताई नागुलवार तसेच सरपंच संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मरपल्ली परिसरातील नागरिकांच्या दळणवळणासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा असून, गेल्या दोन वर्षांपासून पुलाच्या बांधकामासाठी सातत्याने निवेदने देण्यात येत आहेत. मात्र, अद्यापही संबंधित प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सुरजागड लोह प्रकल्पाच्या परिसरातील सुमारे २५ किलोमीटर अंतरातील नागरिकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, पुलाची झालेली दुरवस्था आणि परिसरातील खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
या मार्गावर यापूर्वी काही अपघातांमध्ये नागरिकांना जीव गमवावा लागल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुलाच्या बांधकामाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने देण्यात आली आहेत. स्थानिक आमदार व खासदारांच्या माध्यमातूनही हा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला, मात्र अद्याप कामाला सुरुवात झालेली नसल्याचे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे.
१५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास उपोषण
मरपल्ली पुलाच्या बांधकामास तातडीने मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी प्रज्वल नागुलवार, मीनाताई नागुलवार व सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, येत्या १५ दिवसांत पुलाच्या बांधकामाबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या प्रश्नाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.