संघर्षातून उभारलेल्या यशाला ‘वुमन्स अचीव्हमेंट अवॉर्ड’ची मोहोर
के.सी. कपडा बाजारच्या संचालिका कशिश चांगलानी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
राकेश तेलकुंटलवार उपसंपादक
महाराष्ट्र प्रहार न्यूज
गडचिरोली : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उद्योग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या के.सी. कपडा बाजारच्या संचालिका तथा मनस्विनी मंचच्या संस्थापक सदस्या कशिश चांगलानी यांना दैनिक देशोन्नती व मनस्विनी मंचच्या वतीने ‘वुमन्स अचीव्हमेंट अवॉर्ड’ प्रदान करून गौरविण्यात आले.
दैनिक देशोन्नतीच्या २२ व्या व मनस्विनी मंचच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील सुमानंद सभागृहात आयोजित भव्य श्रावणी महोत्सवाच्या समारोपीय व पुरस्कार वितरण सोहळ्यात कशिश चांगलानी यांचा हा सन्मान करण्यात आला. देशोन्नतीचे मुख्य संपादक लोकनेते प्रकाशभाऊ पोहरे, आमदार रामदास मसराम आणि दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन लि., मुंबईचे संचालक प्रचित पोरेड्डीवार यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रसिद्ध साहित्यिक कुसुम आलाम, प्रसिद्ध वक्ते तथा प्राचार्य डॉ. नरेंद्र आरेकर, देशोन्नतीचे आवृत्ती प्रमुख प्रा. अनिल धामोडे, इंडियन आयडॉल व लिटिल चॅम्प्स फायनलिस्ट भाग्यश्री टिकले (मुंबई), मनस्विनी मंचच्या जिल्हा संयोजिका सुलभा धामोडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
प्रतिकूल परिस्थितीतून यशस्वी उद्योजकतेकडे
कशिश चांगलानी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करीत के.सी. कपडा बाजारच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. प्रबळ इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी जीवनातील कठीण प्रसंगांवर मात केली. दुर्धर आजाराशी झुंज देत असतानाही त्यांनी हार न मानता नव्या उमेदीने व्यवसाय क्षेत्रात दमदार पुनरागमन केले.
शून्यातून सुरुवात करीत गडचिरोली शहरात भव्य कपडा बाजाराचे शोरूम उभारून त्यांनी महिला उद्योजकतेचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या संघर्षमय वाटचालीतून अनेक महिलांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळत आहे.
जिद्द, संघर्ष आणि कर्तृत्वाची दखल
जीवनातील कठीण संघर्षावर मात करून यशस्वी उद्योजिका म्हणून निर्माण केलेली ओळख आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत मनस्विनी मंचच्या वतीने कशिश चांगलानी यांची ‘वुमन्स अचीव्हमेंट अवॉर्ड’साठी निवड करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सन्मानामुळे त्यांच्या उद्योजकीय वाटचालीला विशेष गौरव प्राप्त झाला आहे.