आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त कोरचीत सामाजिक उपक्रम
ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप
जितेंद्र सहारे प्रतिनिधी
कोरची : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त कोरची येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून कोरची येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले, तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय नोटबुकचे वाटप करण्यात आले.
कोरची ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या फळवाटप कार्यक्रमात रुग्णांना फळे देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे रुग्णांनी स्वागत केले. यावेळी रुग्णांनी आमदार मसराम यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत सदिच्छा व्यक्त केल्या.
तसेच कोरची येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय नोटबुकचे वाटप करण्यात आले. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त कोरची तालुक्यासह आरमोरी विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, नगराध्यक्ष हर्षलता भैसारे, वसीम शेख, रवी नंदेश्वर, गोपाल मोहुर्ले, खेदुराम साहू, जितेंद्र सांडील, हमीद पठाण, दुखूराम सांगसूरवार, अरुण मोहुर्ले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांमुळे वाढदिवसाला सामाजिक कार्याची जोड मिळाली असून, रुग्ण व विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.